सांगली दर्पण Exclusives! बोगस डॉक्टरांचे 'रक्षणकर्ते' की प्रशासकीय अधिकारी? जिल्हा समितीच्या बैठका फक्त 'चहा-पाण्या'पुरत्याच मर्यादित!
सांगली जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या 'बोगस डॉक्टर शोध समिती'चा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. दर तीन महिन्यांनी जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतात, मात्र या बैठकांमध्ये केवळ सरकारी चहा पिऊन विषय मार्गी लावले जात आहेत.
गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता, अपवाद वगळता एकाही बोगस डॉक्टरवर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टर शिल्लक नाहीत की प्रशासनाने या प्रकाराकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केली आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
शेकडो लॅब आणि क्लिनिक्स रडारबाहेर?
जिल्ह्यात आज गल्लीबोळात रक्त, लघवी तपासणारे अनधिकृत लॅब चालक आणि पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणारे शेकडो 'मुन्नाभाई' उजळ माथ्याने फिरत आहेत. मात्र, एसी केबिनमध्ये बसून बैठका घेणाऱ्या समितीतील बड्या अधिकाऱ्यांना हे साधे विदारक सत्य का दिसत नाही? लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या व्यावसायिकांवर कारवाई करण्यास समितीला नेमकी कोणती अडचण येत आहे, हे आता संशोधनाचा विषय बनले आहे.
सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट
एकिकडे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असताना, दुसरीकडे सरकारी रुग्णालयांची अवस्थाही काही वेगळी नाही. रुग्णालयांमध्ये पूर्णवेळ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असणे अपेक्षित असताना, गरिबांच्या उपचाराची जबाबदारी 'आयुष'चे कंत्राटी डॉक्टर आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (CHO) खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांची दिशाभूल होत असून, त्यांना अपेक्षित सेवा मिळत नाहीये.
यंत्रणा घेतेय 'गांधारी'ची भूमिका!
कोट्यवधी रुपयांचा निधी आरोग्य सेवेवर खर्च होत असताना, प्रत्यक्षात मात्र यंत्रणा गांधारीची भूमिका घेऊन सर्व गैरप्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे दिसून येत आहे. बोगस डॉक्टरांना मिळणारे हे 'अदृश्य' अभय आणि समितीतील पदसिद्ध अधिकाऱ्यांचा ढिम्म कारभार यामुळे सामान्य जनतेच्या जिवाचे मोल संपले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर या समितीने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.