सांगली :- कसबे डिग्रजमध्ये रक्ताचा सडा! किरकोळ वादातून तरुणाची अंगावर काटा आणणारी हत्या; आरोपींच्या मुसक्या आवळल्या
सांगली (कसबे डिग्रज): मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून आणि मुलांच्या भांडणावरून झालेल्या वादातून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. सागर संजय गायकवाड (वय ३०) या तरुणाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून एका अल्पवयीन मुलासह दोन मुख्य संशयितांना तातडीने अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलाने धैर्यशील करंटे यांच्याकडे पाहिल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. "काय पाहतोस?" असे विचारल्याचा राग मनात धरून संशयितांनी धमकी दिली होती. हा वाद मिटवण्यासाठी सागर गायकवाड मध्यस्थी करत असतानाच, संशयित संस्कार आळतेकर, हर्षवर्धन चव्हाण आणि एका अल्पवयीन मुलाने त्याला लक्ष्य केले.
रात्रीच्या अंधारात थरार!
रात्री साडेनऊच्या सुमारास सागर समडोळी रोडवरील खराटे यांच्या शेताजवळ असताना, संशयितांनी तिथे धाव घेतली. संस्कार आळतेकर याने आपल्याकडील धारदार शस्त्राने सागरच्या छातीवर आणि डोक्यावर वर्मी घाव घातले. लाथाबुक्क्यांनी आणि काठीने करण्यात आलेल्या या अमानुष मारहाणीत सागर गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
पोलिसांचा दणका!
घटनेची माहिती मिळताच सांगली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संशयित संस्कार सचिन आळतेकर (वय १९) आणि हर्षवर्धन गिरीश चव्हाण (वय १९) यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. संदीप नारायण गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
"वाद संपवूया" असे म्हणतच केला घात!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सागर आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. रविवारी "वाद संपवूया" असे सांगत आरोपींनी त्याला गाठले आणि संधी मिळताच त्याचा घात केला. या घटनेमुळे कसबे डिग्रजमध्ये दहशतीचे वातावरण असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.