मुंबई : पायधुनी येथे एका कुटुंबातील चार जणांचा रविवारी रात्री विषबाधा होऊन मृत्यू झाला. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुली यांचा समावेश आहे. विषबाधा झालेल्या सर्वांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. मृत झालेल्या कुटुंबीयांनी २५ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नातेवाईकांसह एकत्र जेवण केले. एकूण नऊ जणांनी जेवण घेतले होते. जेवणानंतर नातेवाईक आपल्या घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास या चौघांनी कलिंगड खाल्ले.
रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास चौघांनाही उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने कौटुंबिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सकाळी १०.१५ वाजता धाकट्या मुलीचा मृत्यू झाला, तर रात्री १०.३० वाजता कुटुंब प्रमुख अब्दुल्ला डोकाडिया याने अखेरचा श्वास घेतला. यापूर्वीच पत्नी आणि मोठ्या मुलीचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी शवविच्छेदन करण्यात आले असून नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या घटनेची नोंद जे. जे. मार्ग पोलीस ठाणे येथे अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.