Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटील आणि सुहास बाबरांच्या 'गुदगुल्या' चर्चेत!

जयंत पाटील आणि सुहास बाबरांच्या 'गुदगुल्या' चर्चेत!


आटपाडीचे शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील जिल्हा परिषदेचे सभापती झाले, पण ते महाविकास आघाडीकडून झाले. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील सत्तेत ते सहभागी झाले. त्याच दिवशी सायंकाळी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी पृथ्वीराज पाटील यांचा विट्यात फेटा बांधून सत्कार केला.
मात्र बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत भाजपला पाठींबा दिला होता. तर तानाजीरावांनी आपले दोन सदस्य गैरहजर ठेवले होते. या मांडणीतून शिवसेना आणि बाबर-पाटील यांची स्थानिक राजकारणात समझोता एक्स्प्रेस सुसाट धावताना दिसते आहे. तर आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जयंत पाटील साखरपेरणी करताना दिसत आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे सात सदस्य विजयी झाले. यापैकी दोन तानाजी पाटील यांच्या आटपाडी तालुक्यातील असून एक त्यांचा मुलगा पृथ्वीराज. सत्ता स्थापन करताना भाजपकडे १६ सदस्य होते. जनसुराज्य व रयतचे प्रत्येक एकेक असे त्यांचे संख्या बळ झाले १८. यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करत शिवसेना आपल्या सोबत असल्याची घोषणा करण्यात आली

ज्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी आपले सगळे सात सदस्य घेऊन महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन न करता भाजपचा पराभव दिसत असताना त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले. हरलेल्या डावात ते भागीदार झाले आणि राज्यातील सत्ताकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा थेट रोष घेण्याचे त्यांनी टाळले.
या खेळात भाजपचे एकूण सदस्यांची संख्या २५ वर अडली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपला मोर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादी वळवत पुन्हा एकदा अध्यक्ष आमचाच होईल अशी घोषणा केली. मात्र तळ्यात-मळ्यात भूमिका असलेल्या राष्ट्रवादीच्या बहुतांश मंडळींनी शेवटी महाविकास आघाडीला पाठींबा दिला.

दरम्यान या खेळात सुहास बाबर यांना सत्तेच्या बळावर विटा पालिका आणि खानापूर पंचायत समितीचा कारभार हाकायचा असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांना आपली ताकद तिथे वाढवायची आहे. भाजपला थेट अंगावर घेऊन नुकसानच होणार असल्याचे त्यांनी गणित कळल्याने हे नुकसान त्यांनी हुशारीने टाळले.

त्याचवेळी तानाजी पाटील यांना मात्र त्यांनी 'ज्या जिले अपनी जिंदगी', असेच संकेत देत पूर्ण सुट दिली. ज्यामुळे तानाजीरावांनी महाविकास आघाडीला थेट पाठिंबा न देता आपले दोन सदस्य गैरहजर ठेवले. सत्तेचा खेळ बिघडणार नाही, याची पुरेपूर काळजी तानाजी पाटलांना पुढे करत सुहास बाबर यांनी घेतली.
आता महाविकास आघाडीने तानाजी पाटील यांना सोबत घेत पृथ्वीराज यांना सभापतीपद दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला आले आहे. ही मांडणी अन्य संस्थांच्या राजकारणापेक्षा आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महत्वाची मानली जात आहे. जयंत पाटील यांनी तानाजीरावांना बळ देऊन पडळकर विरोधकाला बळ देण्याचे धोरण राबवले आहे. या खेळात सुहास बाबर अप्रत्यक्ष सहभागी असल्याने भविष्यात रंगत वाढत जाणार हे स्पष्ट आहे.या सर्व घडामोडीवर दोघांच्या  गुदगुल्या मात्र चर्चेत. 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.