मुंबई : देशात वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असताना केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार आता लाखो कुटुंबांना पूर्वीपेक्षा दुप्पट लाभ मिळणार असून, काही पात्र कुटुंबांसाठी आरोग्य विमा संरक्षणाची मर्यादा ५ लाखांवरून थेट १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आयुष्मान भारत योजना नेमकी काय?
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. देशभरातील हजारो रुग्णालयांमध्ये या योजनेद्वारे कॅशलेस आणि पेपरलेस उपचार सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, उपचार पहिल्या दिवसापासूनच कव्हर केले जातात आणि कुटुंबातील सदस्यसंख्या किंवा वयावर कोणतीही मर्यादा नसते.
कुटुंब संकल्पनेला महत्त्व
या योजनेत 'कुटुंब' ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मुख्य लाभार्थ्यासोबतच पती-पत्नी, मुले, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होतो. त्यामुळे एका योजनेत संपूर्ण कुटुंबाला आरोग्य संरक्षण मिळते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ
केंद्र सरकारने गेल्या वर्षी ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचे संरक्षण जाहीर केले आहे. ही अतिरिक्त रक्कम कुटुंबासाठी असलेल्या ५ लाखांच्या फॅमिली फ्लोटरपासून वेगळी असते. त्यामुळे एकूण विमा संरक्षण १० लाख रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र, कुटुंबातील संबंधित व्यक्तीचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक असणे आणि त्याची नोंद आधार कार्डवर असणे आवश्यक आहे.
अचानक येणाऱ्या खर्चावर दिलासा
आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अचानक उद्भवणाऱ्या आजारांमुळे उपचाराचा मोठा खर्च करणे अनेक कुटुंबांसाठी कठीण ठरते. अशा परिस्थितीत ही योजना मोठा आर्थिक आधार देते. जे लोक खासगी आरोग्य विमा घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरते.
राज्यांच्या योजनांसोबत समन्वय
केंद्र सरकारने विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करून आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात ही योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह संलग्न करण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील नागरिकांना अधिक व्यापक आरोग्य संरक्षण मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.