Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमरावतीत माणुसकीला काळिमा! १६ वर्षीय मुलीचे सक्तीने टक्कल करून घरात कोंडले; गुन्हा दाखल

अमरावतीत माणुसकीला काळिमा! १६ वर्षीय मुलीचे सक्तीने टक्कल करून घरात कोंडले; गुन्हा दाखल


अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत अस्वस्थ करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका १६ वर्षीय मुलीचे सर्व केस कापून तिला घरात बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे कृत्य दुसरं तिसरं कुणी नव्हे तर तिच्याच आई वडिलांनी केलं आहे. या प्रकरणी वरूड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार नेमका कशातून घडला? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.


नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कुटुंब वास्तव्यास आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची असून ती शिक्षण घेत आहे. एका मुलाची तिच्यावर वाईट नजर असून तो तिचा पाठलाग करत असल्याचा संशय तिच्या पालकांना होता. पालकांनी यापूर्वी मुलीला सांगितलं होतं की, संबंधित मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार दे. मात्र, मुलीनं तक्रार दिली नाही. यानंतर पालकांनी जे पाऊल उचललं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
मुलीचे सौंदर्य आणि तिचे केस पाहून मुले तिच्याकडे आकर्षित होतात, असा विचित्र समज करून घेत तिच्या आई-वडिलांनी तिचे पूर्ण केस कापले आणि तिला टक्कल करून घरात बसवले. मुलीने विरोध करूनही पालकांनी तिचं ऐकलं नाही. या प्रकारानंतर पीडित मुलीने थेट वरुड पोलीस स्टेशन गाठून आपल्या जन्मदात्या आई-वडिलांविरुद्ध तक्रार दिली. आई-वडिलांनी आपल्याला घरात बसवून ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
मुलीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरुड पोलिसांनी आई आणि वडील या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. पोटच्या मुलीसोबत अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आता पीडित अल्पवयीन मुलीला महिला व बालविकास आयुक्तालयाच्या शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहात पाठवलं आहे. आता या मुलीवर वाईट नजर टाकणारा तरुण नक्की कोण होता? ज्याच्यामुळे पालकांनी मुलीचे केस कापले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.