महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठीचा कायदा पारित करून घेण्यासाठी संसदेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. या अधिवेशनादरम्यान १८ तास महिला आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान सत्ताधारी बाकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री व खासदारांनी भूमिका मांडल्या. त्याचप्रमाणे विरोधी बाकांवरूनही प्रियांका गांधी, कनिमोळी, ए राजा, कल्याण बॅनर्जी अशा खासदारांनी आपापली मतं मांडली. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील महिला आरक्षणाबाबत केलेल्या भाषणात सविस्तर भूमिका मांडली. पण भाषणाआधी महिलांचं आपल्या आयुष्यात महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर सभागृहात एकच हशा पिकला!
राहुल गांधींच्या हाताला जखम!
राहुल गांधी भाषणाला उभे राहताच अध्यक्षपदी बसलेले ओम बिर्ला यांनी त्यांच्या हाताला बांधलेल्या पट्टीकडे पाहून काय झालं? अशी विचारणा केली. त्यावर राहुल गांधींनी हाताच्या अंगठ्याला थोडी जखम झाल्याचं सांगितलं. या संभाषणानंतर राहुल गांधींनी भारतात महिलांचं महत्त्व अधोरेखित करायला, महिलांकडून पुरुषांना आयुष्यभर कशा प्रकारे विविध बाबी शिकायला मिळतात, हे सांगायला सुरुवात केली.
…आणि लोकसभेत एकच हशा पिकला!
राहुल गांधींनी भाषणाच्या सुरुवातीला महिलांचं महत्त्व अधोरेखित केलं. “महिला या देशातला एक महत्त्वाचा घटक आहे. या सभागृहातला प्रत्येकजण आपल्या आयुष्यात महिलांकडून खूप काही शिकत आल आहे. आई, बहिणी, पत्नी” असं म्हणून ते काही क्षण थांबले. त्यांनी समोर सत्ताधारी बाकांवर किरेन रिजिजू यांच्याकडे पाहून स्मित केलं. मग रिजिजूंनी केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, “जसं किरण रिजिजूंनीही सांगितलं. पण अर्थात.. पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्या स्वत:च्या आयुष्यात पत्नीचा तसा काही त्रास नाही. त्यामुळे आम्हाला त्यासंदर्भात माहिती नाही”, असं राहुल गांधींनी म्हणताच संपूर्ण सभागृहानं या कोटीला मनमुराद हसून दाद दिली.
“जे मला २० वर्षांत जमलं नाही, ते प्रियंकानं ५ मिनिटांत करून दाखवलं” यानंतर राहुल गांधींनी आणखी एक कोटी केली. तेव्हाही विरोधी बाकांप्रमाणेच सत्ताधारी बाकांवरच्या खासदारांनीदेखील त्यांना हसून दाद दिली. “काल मी इथे माझ्या बहिणीला बोलताना बघत होतो. तिनं फक्त ५ मिनिटांत असं काहीतरी साध्य केलं, जे मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत साध्य करू शकलो नाही. ते म्हणजे अमित शाह यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं. ही गोष्ट मलाही शिकून घ्यावी लागेल. तिचा मोठा भाऊ म्हणून मला खूप गर्व वाटत होता. अर्थात ती माझ्यापेक्षा वेगळी आहे”, असं राहुल गांधींनी सांगितलं.
इंदिरा गांधींची ‘ती’ आठवण!
दरम्यान, राहुल गांधींनी यावेळी त्यांच्या आजी व देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची एक आठवण सांगितली. “लहानपणी मला अंधाराची फार भीती वाटायची. आमच्याकडे एक मोठा कुत्रा होता. तो नेहमीच मी आणि माझ्या बहिणीवर हल्ला करायचा. त्यामुळे आम्ही रात्रीच्या वेळी बागेत जायला घाबरायचो. त्या रात्री माझे आई-वडील बाहेर जेवायला गेले होते. माझ्या आजीनं माझा हात पकडला आणि बागेत अंधारात नेलं. तिथे लाईटही नव्हती. तिनं मला तिथे सोडलं. मला म्हणाली, तू इथे थांब, अजिबात हलू नकोस. आणि ती निघून गेली. तेव्हा तर माझी हवाच निघून गेली. मी म्हटलं आता मी गेलो. माझ्यात हिंमत नव्हती की मी आजीला सांगेन की मला अंधारात थांबायचं नाहीये. म्हणून मग मी तिथेच थांबलो”, असं म्हणून राहुल गांधींनी पुढचा प्रसंग सांगायला सुरुवात केली.“२-३ मिनिटं झाली असतील. पण मला ते २-३ तासांसारखे वाटले. मी सर्व प्रकराच्या भीतीदायक कल्पना करत होतो. तेवढ्यात माझी आजी आली. तिनं विचारलं, तुला कशाची भीती वाटते? मी म्हटलं मला त्या कुत्र्याची भीती वाटते, बागेतल्या अनोळखी लोकांची भीती वाटते, मला ज्या गोष्टी दिसत नाहीत, त्यांची भीती वाटते. आजी म्हणाली, नाही राहुल.. तुला कुत्र्याची, लोकांची किंवा या कशाचीच भीती वाटत नाही. तुला फक्त तुझ्या मनाची भीती वाटते. तुझ्या विचारांची भीती वाटते”, असं राहुल गांधींनी भाषणादरम्यान सांगितलं.
इंदिरा गांधींनी राहुल गांधींना दिलेला सल्ला…
दरम्यान, त्या दिवशी सत्यासाठी लढण्याचा धडा आजी इंदिरा गांधींनी आपल्याला दिल्याचं राहुल गांधी म्हणाले. “मग आजी म्हणाली, तू अंधाराला घाबरता कामा नये. कारण सत्य बहुतेक वेळा अंधारात असतं. जर तु्झ्यात तुझ्या भीतीचा सामना करण्याचं धैर्य नसेल, अंधारात जाण्याचं धैर्य नसेल, तर तुला सत्य कधी शोधताच येणार नाही, सत्यासाठी तू कधी भांडूच शकणार नाही. तो एक राजकीय धडा होता. मला तेव्हा कळलं नाही. पण आता मी मोठा झाल्यानंतर मला लक्षात आलं की तो फक्त राजकीय धडा नाही, तर धार्मिक धडादेखील आहे. मला लक्षात आलं नाही की आजी मला सांगायचा प्रयत्न करत होती सत्यम् शिवम् सुंदरम्”, असं राहुल गांधी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.