पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत भवानीपूर मतदारसंघातून आपली उमेदवारी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशियारी येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, “भवानीपूरमधून माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी दोन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. त्यांना तसे करता आले नाही; पण कल्पना करा-जर ते माझ्या विरोधात असे करू शकत असतील, तर इतरांच्या विरोधात ते काय काय करू शकतील!” भवानीपूर मतदारसंघात त्यांच्याविरोधात भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी रिंगणात आहेत.
बॅनर्जी यांनी विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरही टीका करत ९० लाख मतदारांची नावे जबरदस्तीने वगळण्यात आल्याचा आरोप केला. यात ६० लाख हिंदू आणि ३० लाख मुस्लिम मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. "बांग्ला बोलतो म्हणून आम्ही भारतीय नाही का? आम्हाला वारंवार नागरिकत्व सिद्ध करावे लागेल का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला "भाजपची वॉशिंग मशीन" असे संबोधत त्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा कट असल्याचाही आरोप केला. मतमोजणीदरम्यान भाजप आघाडीवर असलेल्या जागांचे निकाल आधी जाहीर करून, तृणमूल आघाडीवर असलेल्या जागांवर विलंब करण्याची योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. समान नागरी संहिता (UCC) बाबत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, "यूसीसी म्हणजे एक देश, एक नियम नव्हे तर एक भाजप, एक नियम आहे." त्यांनी आरोप केला की, या माध्यमातून धार्मिक परंपरांवर बंधने आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये यूसीसी लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.झारग्राममधील दुसऱ्या सभेत त्यांनी निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला. महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपवर टीका करत त्यांनी विचारले की, "पक्षात महिलांचे प्रतिनिधित्व किती आहे?" तृणमूल काँग्रेसने ३७ टक्क्यांहून अधिक महिलांना संधी दिल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी टीका केली की, हे नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच राज्यात येतात. "ते स्थलांतरित पक्ष्यांसारखे आहेत," अशी टीका त्यांनी केली.
याशिवाय, मतदानाच्या दिवशी झारखंडमधून लोकांना आणले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करून बाहेरील अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपशासित राज्यांमध्ये खानपानावर निर्बंध घालण्याचा आरोप करत त्यांनी विचारले की, "आपण काय खावे, यावर आदेश देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?" परिसीमनामागे लोकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्याचा "खरा अजेंडा" असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला दोन टप्प्यात मतदान होणार असून 294 जागांवर हे मतान होईल आणि 4 मेला निकाल जाहीर होणार आहेत. सध्या ममता बॅनर्जी यांचे सरकार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.