"स्मार्ट टीव्हीवरचे मोफत चॅनेल्स आता पेड होणार? ट्राय (TRAI) च्या नव्या नियमांमुळे १३ कोटी युजर्सना झटका!"
भारतात सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केवळ इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर केबल किंवा डीटीएच शिवाय शेकडो चॅनेल्स मोफत पाहणाऱ्या १३ कोटींहून अधिक भारतीयांना आता मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया आता स्मार्ट टीव्हीवरील ॲप्सनाही केबल आणि DTH सारख्या कडक नियमांच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. यामुळे आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या चॅनेल्ससाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागण्याची चिन्हे आहेत.
मोफत चॅनेल्सचा सुवर्णकाळ संपणार?
सध्या अनेक स्मार्ट टीव्ही युजर्स कोणत्याही केबल कनेक्शनशिवाय केवळ इंटरनेटद्वारे १५० हून अधिक चॅनेल्स मोफत पाहत आहेत. मात्र, केबल आणि DTH कंपन्यांना सरकारला मोठी फी द्यावी लागते आणि कडक नियमांचे पालन करावे लागते. याउलट, स्मार्ट टीव्ही ॲप्सवर असे कोणतेही निर्बंध नसल्याने DTH कंपन्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ही विषमता दूर करण्यासाठी 'ट्राय' आता नवीन नियमावली तयार करत आहे. यावर अंतिम निर्णय ४ मे २०२६ रोजी येण्याची शक्यता आहे.
काय आहे मुख्य वाद?
DTH आणि केबल ऑपरेटर्सचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडून प्रत्येक चॅनेलसाठी शुल्क आकारले जाते आणि त्यांना टॅक्सही भरावा लागतो. मात्र, स्मार्ट टीव्हीवर अनेक चॅनेल्स ॲप्सच्या माध्यमातून इंटरनेटवर फ्री उपलब्ध आहेत. यामुळे केबल व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. जर 'ट्राय'ने स्मार्ट टीव्ही ॲप्सनाही 'ब्रॉडकास्टिंग' नियमांत आणले, तर हे मोफत चॅनेल्स बंद होतील किंवा त्यांच्यासाठी 'सबस्क्रिप्शन' फी भरावी लागेल.
कोणावर होणार परिणाम?
भारतातील सुमारे १३ कोटी युजर्स स्मार्ट टीव्हीवर न्यूज, एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स चॅनेल्स मोफत पाहतात, त्यांच्यासाठी हा मोठा बदल असेल. मात्र, जे युजर्स केवळ Netflix, Amazon Prime किंवा YouTube पाहण्यासाठी स्मार्ट टीव्ही वापरतात, त्यांच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही. तरीही, ज्यांना घरबसल्या मोफत बातम्या आणि सिरीयल्स पाहण्याची सवय आहे, त्यांना मात्र खिशाला कात्री लावावी लागेल. येत्या ४ मे रोजी 'ट्राय' काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. टीव्ही पाहण्याचा अनुभव आणि खर्च या निर्णयामुळे पूर्णपणे बदलू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.