अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिका-इराण शांतता बैठकीबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या दोन्ही देशांच्या वाटाघाटीची चर्चा फिस्कटली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी रविवारी पहाटे पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली असून इराणसोबत कोणताही करार न करता माघारी जात असल्याचं सांगितले आहे. तब्बल 21 तास सुरु असलेल्या या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने जगाची चिंता वाढली आहे.
अमेरिका- इराण संघर्ष चिघळणार?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जागतिक राजकारणाचे केंद्र केंद्र बनलेल्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेली महत्त्वाची चर्चा अखेर कोणत्याही ठोस निर्णयाविना संपुष्टात आली. तब्बल २१ तास चाललेल्या या चर्चेत दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शांततेचा मार्ग पुन्हा एकदा अंधकारमय झाला आहे.अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, अनेक मुद्द्यांवर खल झाला, मात्र इराणने अटी मान्य करण्यास नकार दिल्याने कोणताही समझोता होऊ शकला नाही. लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमुळे धोक्यात आलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला मुदतवाढ देण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
इराणने ठणकावले, अमेरिकेचाही इशारा
अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व जेडी वेंस करत होते, तर इराणकडून संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलिबाफ चर्चेत सहभागी होते. "ही चर्चा फिस्कटणे ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी मोठी धोक्याची घंटा आहे," असे सूचक विधान वेंस यांनी मायदेशी परतण्यापूर्वी केले. दुसरीकडे, इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला असून 'शरणागतीची कोणतीही अट मान्य करणार नाही' असे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झुल्फिकारी यांनी ठणकावून सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनीतील वर्चस्वाचा प्रश्न आणि इराणमधील सत्तापालटानंतरही न बदललेली स्थिती यामुळे हा तिढा सुटण्याऐवजी अधिकच क्लिष्ट झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.