सांगली दर्पण Exclusive  गुरुच्या निधनानंतर चेल्याचा प्रताप; राज्य उत्पादन शुल्क विभागात दलालाचा उच्छाद, 'सांगली दर्पण'चा पर्दाफाश!


सांगली दर्पण Exclusive! सांगली :- राज्य उत्पादन शुल्क विभागात गेल्या २० वर्षांपासून 'झिरो' म्हणून वावरणारा प्रवीण आण्णा नावाचा इसम आता जिल्ह्याचा 'वसुली सम्राट' बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या दिवंगत गुरूचा वारसा सांगणाऱ्या या बहाद्दराने चक्क प्रशासकीय व्यवस्थेलाच ओलीस धरले असून, या काळ्या कारनाम्याची गंभीर दखल आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) घेतल्याने खळबळ उडाली आहे.

​अधिकाऱ्यांचे 'कलेक्शन' आणि घरपोच हप्ता!
खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या वतीने महिन्याचे 'कलेक्शन' करण्याचे काम हा प्रवीण आण्णाच करतो. एवढेच नव्हे, तर या वसुलीतून स्वतःचा भरभक्कम हिस्सा कापून उर्वरित रक्कम अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची 'होम डिलिव्हरी' सेवाही त्याने सुरू केली आहे. या 'काळ्या कमाई'चे सर्व धागेदोरे आता एसीबीच्या हाती लागले असून, लवकरच मोठा धमाका होण्याची शक्यता आहे.
​बायपास रोडवर थाटले समांतर कार्यालय!

प्रवीण आण्णाचे धाडस इतके वाढले आहे की, त्याने बायपास रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला समांतर असे स्वतःचे खासगी कार्यालय थाटले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सर्व 'सेटलमेंट' याच कार्यालयातून चालतात. सरकारी कार्यालयात बसण्याऐवजी अधिकारी याच खासगी दरबारात हजेरी लावतात की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

​२० वर्षांचा 'झिरो' आता 'हिरो' कसा झाला?
दोन दशकांपासून या विभागात किरकोळ कामे करणारा हा व्यक्ती आपल्या गुरूच्या मृत्यूनंतर अचानक कोट्यधीश झाला कसा? स्वतःचा डामडोल आणि महागड्या गाड्यांचा ताफा हा भ्रष्टाचाराच्या पैशातूनच उभा राहिला असल्याचा संशय आहे.
​आयुक्त साहेब, आता तरी डोळे उघडणार का?

एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत असताना, सांगलीत मात्र प्रवीण आण्णासारखी माणसे समांतर शासन चालवत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की त्यांचाही याला मूक पाठिंबा आहे? हा खेळ असाच चालू राहिला तर सर्वसामान्यांचा प्रशासनावरचा विश्वास उडेल.

​सांगली दर्पणचा इशारा:
प्रवीण आण्णाचे हे कारनामे म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. येत्या काळात त्याचे अजून अनेक 'काळे धंदे' आणि त्याला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचे चेहरे 'सांगली दर्पण' पुराव्यासह उघडे पाडणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, भ्रष्टाचाराच्या या मालिकेचा पूर्ण पर्दाफाश होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील!

क्रमश......



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.