Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! रोहित पवारांचा खळबळजनक दावा: २२ आमदारांसह तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपच्या चिन्हावर लढणार!

Big Breaking! रोहित पवारांचा खळबळजनक दावा: २२ आमदारांसह तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपच्या चिन्हावर लढणार!


राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी काल खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. तटकरे यांनी ही भेट फक्त तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगितले. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनी या भेटीबाबत मोठा दावा केला आहे. २२ आमदार घेऊन खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपामधून लढणार असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

" तटकरे आणि पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ आमदार घेऊन भाजपामधून लढणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही काही आमदार गळाला लागले आहेत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. मावळचे आमदार भाजपामधून लढणार आहेत असेही पवार म्हणाले. सुनिल तटकरे यांना सिल्वर ओकवरील चहा आवडत असेल, असा टोलाही रोहित पवार यांनी तटकरे यांना लगावला.


खासदार सुनिल तटकरे यांनी शरद पवारांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर पवारांची प्रकृती आता उत्तम असून, तटकरे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

सुनील तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की, ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. पवार साहेब रुग्णालयातून घरी परतल्यापासून त्यांची भेट घेण्याचे नियोजन होते, मात्र वेळेअभावी ते शक्य झाले नव्हते. अखेर काल ही भेट पार पडली. तटकरे यांनी आवर्जून नमूद केले की, या भेटीत कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही.

सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीर्घ काळ काम केले आहे. त्यांच्या राजकीय जडणघडणीत पवारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी मान्य केले. "महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद असले तरी मनभेद न ठेवण्याची एक समृद्ध परंपरा आहे, आणि याच परंपरेला अनुसरून ही भेट घेतली," असे तटकरे यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.