Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"खासगी बस चालकांची दादागिरी संपणार; राज्य सरकारचा मोठा दणका!"

​"खासगी बस चालकांची दादागिरी संपणार; राज्य सरकारचा मोठा दणका!"


सणासुदीच्या काळात किंवा सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर आता सरकारचा चाबूक बसण्याची चिन्हे आहेत. बेकायदेशीर भाडेवाढ, अनधिकृत मोबाईल बुकिंग ॲप्स आणि प्रवाशांची आर्थिक पिळवणूक याची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी बस चालकांच्या मनमानीला लगाम लागणार आहे.

मंत्रालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भारत कलस्कर, तसेच ‘सुराज्य अभियान’चे प्रतिनिधी अभिषेक मुरुकाटे, अरविंद पानसरे आणि सुनील हणवत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आणखी एका आढावा बैठकीचे आयोजन केले जाईल आणि समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाईल. 

अनेक खासगी बस ऑपरेटर्स सण, सुट्ट्या किंवा गर्दीच्या काळात तिकिटांचे दर मनमानी पद्धतीने वाढवत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. काही ठिकाणी तर प्रवाशांकडून दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. सरकारने स्थापन केलेल्या या विशेष समितीत सह-परिवहन आयुक्तांसह 'सुराज्य अभियान' संस्थेचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. ही समिती खासगी बस चालकांची मनमानी भाडेवाढ, बेकायदेशीर बुकिंग ॲप्स आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण यावर सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. सरकारने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, प्रवाशांची फसवणूक किंवा अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या बस चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची पिळवणूक सहन केली जाणार नाही. 

दरम्यान, राज्य सरकारने MSRTC बस स्थानकांवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही भर दिला आहे. प्रत्येक डेपो आणि बस स्थानकावर प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अधिकृत फलक आणि पत्रव्यवहारामध्ये शुद्ध मराठी भाषेचा वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे. प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, १ जूनपासून महाराष्ट्रातील सर्व MSRTC बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, बस स्थानकांवरील स्वच्छतेवरही अधिक लक्ष दिले जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.