Big Breaking!पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक: ताफ्याच्या मार्गावर स्फोटकं जप्त, घातपाताचा डाव उधळला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आलेली आहे. बेंगळुरू दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्याच्या मार्गावर जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली.
बेंगळुरूच्या बाहेरील कनकपुरा रोडवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी या मार्गावरून जाणार होते, मात्र त्याआधीच ही स्फोटके जप्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून वरिष्ठ अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या आसपासची सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडक करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी कग्गलीपुरा क्षेत्रातील थाथागुनी येथे सुरक्षा तपासणी सुरू असताना पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. हे ठिकाण आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या अत्यंत जवळ आहे. जिलेटिनच्या कांड्या एका पुलाच्या कडेला असलेल्या कंपाऊंड वॉलपाशी फेकून देण्यात आल्या होत्या. स्फोटके मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने पंतप्रधानांचा ताफा तिथून जाण्यापूर्वीच ही स्फोटके सापडल्याने मोठा संभाव्य धोका टळला आहे.
फोन करुन दिली होती धमकी
या संपूर्ण घटनेची सुरुवात एका अज्ञात व्यक्तीच्या फोन कॉलने झाली. त्या संशयित व्यक्तीने सकाळी पोलीस स्टेशनला फोन करून एचएएल विमानतळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर जवळ स्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. विमानतळाजवळ काहीही संशयास्पद आढळले नाही, परंतु कनकपुरा रोडवर जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे कोरामंगला भागातून संशयिताला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली असता, त्याने यापूर्वीही व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यावेळी अशाच प्रकारचे धमकीचे फोन केल्याचे समोर आले आहे. मात्र, यावेळी केवळ धमकी देऊन तो थांबला नाही, तर प्रत्यक्ष स्फोटकेही सापडल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.