Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; अन्न व औषध प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला 'केराची टोपली'!​चिरीमिरीच्या नादात 'फूड सेफ्टी' धाब्यावर; निकृष्ट अन्नाचा मारा, अधिकारी सुस्त!​

सांगलीकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; अन्न व औषध प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला 'केराची टोपली'!चिरीमिरीच्या नादात 'फूड सेफ्टी' धाब्यावर; निकृष्ट अन्नाचा मारा, अधिकारी सुस्त!


सांगली :- धुळ, धूर आणि केमिकलयुक्त अन्नाचा मारा सांगलीकरांच्या माथी मारला जात असतानाही, येथील अन्न व औषध प्रशासन (FDA) कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) अन्न सुरक्षा प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आदेश देऊनही, सांगलीत मात्र या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. केवळ 'चिरीमिरी'च्या नादात सामान्य जनतेच्या पोटात विष कालवण्याचे काम सुरू असून, प्रशासकीय यंत्रणा मात्र मूकदर्शक बनली आहे.

​प्रशिक्षणाचे वाभाडे: अधिकाऱ्यांची मनमानी

​शासनाच्या नियमानुसार, मोठ्या हॉटेल्सपासून ते रस्त्यावरील गाड्यांपर्यंत सर्व अन्न व्यावसायिकांना 'अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन' (FoSTaC) पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्न हाताळणाऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवून ग्राहकांना शुद्ध अन्न मिळावे, हा यामागचा शुद्ध हेतू आहे. मात्र, सांगलीत या प्रशिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार:
​प्रशिक्षण टाळण्यासाठी अभय: अनेक व्यावसायिक प्रशिक्षण न घेताच व्यवसाय करत आहेत, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

​खाजगी संस्थांना खो: प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या खाजगी संस्थांना प्रशिक्षण देण्यापासून रोखले जात आहे. काही अधिकारी तर "प्रशिक्षणाची गरजच नाही" असे सांगून शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत आहेत. ​निकालात शून्य: राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना 'प्रशिक्षण' हा महत्त्वाचा निकष असतानाही, सांगली विभागाची कामगिरी कागदावरच मर्यादित उरली आहे.


वरिष्ठांच्या पत्राने फुटले भांडं!
​खुद्द वरिष्ठ पातळीवरून आलेल्या पत्रातच या गोंधळावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात समन्वय ठेवणे अपेक्षित असताना, उलट त्यात अडथळे निर्माण केले जात असल्याचे पत्रात नमूद आहे. स्वतः प्रशिक्षण द्यायचे जमत नाही आणि खाजगी संस्थांना सहकार्य करायचे नाही, अशा दुहेरी भूमिकेमुळे सांगलीकरांचे आरोग्य मात्र टांगणीला लागले आहे.

​"सांगलीत अन्न सुरक्षा अधिकारी केवळ हप्तेखोरीत व्यस्त आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हॉटेलमध्ये मिळणारे अन्न कितपत सुरक्षित आहे, याची शाश्वती देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. जोपर्यंत प्रशिक्षण सक्तीचे होत नाही, तोपर्यंत सांगलीकरांच्या ताटात निकृष्ट दर्जाचेच अन्न पडत राहणार, हे उघड आहे."

​राजमान्य भ्रष्टाचार: प्रशिक्षण प्रमाणपत्र नसतानाही व्यावसायिकांना दिलेली मुभा.
​जाणीवपूर्वक दुर्लक्ष: अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत असूनही तपासणीचा अभाव.
​शासकीय आदेशाचा अवमान: FSSAI च्या मार्गदर्शक सूचनांना केराची टोपली.
​आता या गंभीर प्रकारावर वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, की सांगलीकरांना असेच 'केमिकलयुक्त' अन्न खावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.