Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! सिद्धरामय्यांचा राजीनामा; डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री!

कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! सिद्धरामय्यांचा राजीनामा; डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री!


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज, गुरुवारी (२८ मे) आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत  यांच्या सचिवांकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कार्यकाळातील तीन वर्षे पूर्ण होताच काँग्रेस हायकमांडने त्यांना पद सोडण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

२६ मे रोजी नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यात बंद दाराआड बैठक झाली होती. या बैठकीत नेतृत्वबदलाचा निर्णय अंतिम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजीनाम्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत Breakfast बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार सूत्रे हाती घेतील, असे स्पष्ट केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे इंदूर येथे असल्याने सिद्धरामय्या यांनी 'लोक भवन' येथे राज्यपालांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला.

गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चांना जोर आला होता. विशेषतः नोव्हेंबर महिन्यात डी.के. शिवकुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या एका पोस्टनंतर या चर्चांना अधिक वेग मिळाला. "शब्दांची ताकद हीच जगाची ताकद असते," असे शिवकुमार यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या यांनी, "लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या शब्दांनाच खरी ताकद असते," असे म्हणत आपल्या सरकारच्या पाच हमी योजनांवर भर दिला होता.

मे २०२३ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सत्ता-वाटपाचा करार झाल्याची चर्चा होती. या करारानुसार ठराविक कालावधीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे शिवकुमार यांच्याकडे देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. या चर्चेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती.

नेतृत्वबदलाच्या चर्चांदरम्यान राज्यभरातील 'अहिंद' संघटनांनी सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली होती. त्यांना पदावरून हटवू नये, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डी.के. शिवकुमार यांनी सत्ता हस्तांतरणासाठी जोरदार आग्रह धरल्याने काँग्रेस हायकमांडने अखेर निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांचा राजकीय प्रवास

३ ऑगस्ट १९४८ रोजी म्हैसूर जिल्ह्यातील सिद्धरामनहुंडी येथे जन्मलेल्या सिद्धरामय्या यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून राजकारणात मोठे स्थान मिळवले. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी आणि एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून, काही काळ वकिली व्यवसायही केला.

१९८३ मध्ये लोक दलाच्या तिकिटावर चामुंडेश्वरी मतदारसंघातून ते प्रथम विधानसभेत निवडून आले. जनता पक्ष आणि जनता दलातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अर्थ, पशुसंवर्धन आणि रेशीम उद्योग यांसारखी महत्त्वाची खाती हाताळली. जे.एच. पटेल सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदही भूषवले.

'अहिंद' म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित या सामाजिक गटांच्या राजकारणाचा सिद्धरामय्या यांनी जोरदार पुरस्कार केला. २००५ मध्ये एच.डी. देवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००६ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पोटनिवडणूक जिंकली आणि नंतर विरोधी पक्षनेते झाले.

२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवून देत ते मुख्यमंत्री बनले. २०१३ ते २०१८ हा त्यांचा कार्यकाळ कर्नाटकात सलग पाच वर्षे पूर्ण करणारा दुर्मिळ कार्यकाळ ठरला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी १७ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

२०२३ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पाच हमी योजना राबवल्या. यामध्ये 'गृह लक्ष्मी', 'गृह ज्योती', 'अन्न भाग्य', 'शक्ती' आणि 'युवा निधी' या योजनांचा समावेश होता. महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज, बेरोजगार तरुणांना भत्ता आणि आर्थिक मदत अशा योजनांना मोठा प्रतिसाद मिळाला.

त्यांच्या सरकारने शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदीचा निर्णय मागे घेतला. तसेच, व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान वाहतूक थांबवण्याच्या 'झिरो ट्रॅफिक' प्रोटोकॉलमध्येही बदल करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

सामाजिक न्याय, कल्याणकारी योजना आणि ओबीसी राजकारणाचा मजबूत चेहरा म्हणून सिद्धरामय्या यांची ओळख राहिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकाच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे मानले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.