दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भिलवडी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला रंगेहात पकडण्यात आले. सांगली एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) भिलवडी पोलीस ठाण्यासमोरच ही धडक कारवाई केली. संतोष गोविंदराव बेंबडे (वय ४७, रा. नरगुळ वस्ती, कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
१० हजारांवरून ५ हजारांवर तडजोड
तक्रारदाराविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मिळवून देणे आणि तपासात मदत करण्याच्या बदल्यात हवालदार बेंबडे याने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने १५ मे रोजी सांगली एसीबीकडे रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, बेंबडे याने तडजोडीअंती एकूण ८ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. "आज ५ हजार रुपये द्या आणि उर्वरित ३ हजार रुपये उद्या द्या," असे सांगत त्याने तत्काळ ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
पोलीस रेस्ट रूमजवळ रचला सापळा
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीच्या पथकाने भिलवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. पोलीस ठाण्यासमोरील पोलीस रेस्ट रूमजवळील रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार संतोष बेंबडे याला एसीबीने रंगेहात दबोचले. याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सांगली एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, अजित पाटील, सागर नायकुडे, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, सिमा माने, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, राजेश मुदगल, महेश शेंडगे, बिना जाधव आणि चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.