ईश्वरपूर: नात्याला काळिमा! नातेवाईकांकडे आलेल्या ८ महिन्यांच्या गरोदर महिलेवर बलात्कार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
ईश्वरपूर :- येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय, ८ महिन्यांच्या गरोदर महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा संतापजनक प्रकार २२ ते २७ एप्रिल दरम्यान घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्वप्नील देवकर (वय ३०) आणि मेघा विजय वाघमारे (दोघेही रा. ईश्वरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित गरोदर महिला ईश्वरपूर येथील आपल्या नातेवाईक महिला (संशयित मेघा वाघमारे) हिच्याकडे राहण्यास आली होती. यादरम्यान शेजारी राहणाऱ्या स्वप्नील देवकर याने पीडिता ८ महिन्यांची गरोदर असल्याचे माहीत असतानाही, तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतर स्वप्नील आणि मेघा या दोघांनीही 'हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारू', अशी धमकी पीडितेला दिली होती.
या भयानक प्रकारानंतर पीडितेने हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.