सांगली "जिल्हा बँक म्हणजे सत्ताधार्यांच्या लुटीचे केंद्र; २ महिन्यांत प्रशासक येणार!" – आमदार गोपीचंद पडळकरांचा थेट हल्ला
'कलम ८३' अंतर्गत २२ गंभीर मुद्द्यांवर ठपका!
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "जिल्हा मध्यवर्ती बँकेची 'कलम ८३' अंतर्गत सखोल चौकशी झाली असून, त्यात २२ गंभीर मुद्द्यांवर थेट ठपका ठेवण्यात आला आहे. बँकेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाली असून, सर्व नियम धाब्यावर बसवून मर्जीतील लोकांना कर्जवाटप करण्यात आले आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे."
खासदार विशाल पाटलांचे १०० कोटींचे कर्ज थकीत!
सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत पडळकर पुढे म्हणाले की, "काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांचे बँकेत तब्बल १०० ते १२५ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. एका बाजूला सत्ताधार्यांना आणि बड्या नेत्यांना कोट्यवधींचे कर्ज सहजासहजी मिळते, तर दुसऱ्या बाजूला सामान्य शेतकर्याला स्वतःच्या हक्काच्या कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, वणवण करावी लागते, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे."
अधिकारी आणि संचालकांना इशारा:
बँकेचे कार्यकारी संचालक आणि इतर अधिकाऱ्यांनी सत्ताधार्यांच्या दबावाखाली येऊन कोणतेही बेकायदेशीर किंवा चुकीचे पाऊल उचलू नये. नेत्यांच्या फायद्यासाठी स्वतःला संकटात टाकू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
जत बाजार समितीत १० कोटींचा भूखंड घोटाळा?
जिल्हा बँकेसोबतच पडळकरांनी 'सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या कारभाराचेही वाभाडे काढले. "जत येथील बाजार समितीसाठी आरक्षित असलेल्या १० एकर जागेपैकी २ एकर मोक्याची जागा एका मध्यस्थाला आंदण देण्यात आली आहे. हा सरळ सरळ अंदाजे १० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि त्यांचे समर्थक अशा भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठीच बाजार समितीच्या विभाजनाला जाणीवपूर्वक विरोध करत आहेत," असा गंभीर आरोपही पडळकर यांनी शेवटी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.