Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली झेडपी प्रशासनाला पाझर फुटणार कधी? आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दरमहा 'परवड'; बँकांचे हप्ते, घरभाड्यामुळे कर्मचारी विवंचनेत!

सांगली झेडपी प्रशासनाला पाझर फुटणार कधी? आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दरमहा 'परवड'; बँकांचे हप्ते, घरभाड्यामुळे कर्मचारी विवंचनेत!


सांगली :- जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. मे महिना अर्धा संपत आला, तरी अद्याप कर्मचाऱ्यांच्या पदरात एप्रिल महिन्याचा पगार पडलेला नाही. दर महिन्याला वेतनासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ येत असल्याने, "प्रत्येक महिन्याला सुरू असलेली ही पगाराची ओरड आणि आमची मानसिक कोंडी संपणार तरी कधी?" असा संतप्त सवाल आता कर्मचारी उपस्थित करत आहेत.
​नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या किमान ५ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात हा नियम कागदावरच राहिला आहे. दर महिन्याला उशिराने पगार होण्याची ही समस्या आता कर्मचाऱ्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. २४ तास जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर चालवण्यासाठी मात्र दरमहा कसरत करावी लागत आहे. घरभाडे वेळेत न गेल्याने घरमालकांचा तगादा, मुलांच्या शाळेची थकलेली फी, बँकेच्या कर्जाचे रखडलेले हप्ते आणि दैनंदिन किराणा माल भरताना कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. बँकांचे हप्ते वेळेत न गेल्याने सिबिल (CIBIL) स्कोअर खराब होत असून, नाहक दंडाचा भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
​१२ महिन्यांचा 'लेटलतीफ' कारभार; तारखांचा पुरावाच समोर!

​आरोग्य विभागाचा हा निष्काळजीपणा नवा नाही, तर गेल्या वर्षभराचा कारभार पाहिला तर प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा ढळढळीत पुरावाच समोर येतो. गेल्या १२ महिन्यांत एकदाही वेळेत पगार झालेला नाही. पगार कधी झाला, याच्या तारखा पाहिल्या तर प्रशासनाला लाज वाटेल अशी परिस्थिती आहे:

महिना वेतन मिळालेली तारीख
एप्रिल २०२५ १४ मे २०२५
मे १२ जून २०२५
जून १५ जुलै २०२५
जुलै २१ ऑगस्ट २०२५
ऑगस्ट २५ ऑगस्ट २०२५
ऑक्टोबर १३ नोव्हेंबर २०२५
नोव्हेंबर १० डिसेंबर २०२५
डिसेंबर १४ जानेवारी २०२६
जानेवारी १७ फेब्रुवारी २०२६
फेब्रुवारी १८ मार्च २०२६
मार्च ३० एप्रिल २०२६

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. मार्च महिन्याचा पगार थेट ३० एप्रिलला करून प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली, पण एप्रिलचा पगार मे महिना अर्धा संपला तरी गुलदस्त्यातच आहे.
​...तर काम बंद आंदोलन छेडणार?

"आम्ही रुग्णसेवा प्रामाणिकपणे करतो, मग आमच्या हक्काच्या पगारासाठी आम्हाला दरमहा भिकाऱ्यासारखे का वागवले जाते?" असा संतप्त सूर कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर आरोग्य विस्कळीत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही आता कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वर्तुळातून दिला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.