'चोर भी अजब, चोरी भी गजब!' सांगलीत मोबाईलचे नेटवर्क गुल नाही, तर अख्खा ‘टॉवर’च गायब; चोरट्यांचा भारी 'कारनामा'!
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. आरग परिसरातील जिओ कंपनीचा तब्बल १९ लाख ६० हजार रुपये किमतीचा टॉवर सेट अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरग येथील शेतकरी देवदास माने यांच्या शेतजमिनीत रस्त्यालगत जिओ कंपनीचा टॉवर सेट उभारण्यात आला होता. ६ मे ते ११ मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हा टॉवर सेट पूर्णपणे उचलून नेल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि वजनदार साहित्य चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. या घटनेमागे नियोजनबद्ध टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या चोरीबाबत विशाल प्रभाकर चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १९ लाख ६० हजार रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. टॉवर सेटसारखे मोठे आणि महागडे उपकरण चोरीला गेल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या चोरीसाठी मोठ्या वाहनाचा वापर झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, त्या अनुषंगाने परिसरातील वाहनांची हालचालही तपासली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.