सांगली जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई केली आहे. विटा-तासगाव रोडवरील श्री मंगल कार्यालय परिसरात बेकायदेशीर रित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४ गावठी पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण २ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धीरज सतीश चव्हाण (वय २१ वर्षे, रा. पारे रोड, बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सूर्यकांत साळुंखे, संजय पाटील, सुनील जाधव आणि अभिजीत ठाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
विटा ते तासगाव रोडवर असलेल्या श्री मंगल कार्यालय परिसरात एक इसम पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याचे बातमीदाराने सांगितले. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तातडीने श्री मंगल कार्यालय परिसरात सापळा रचून निगराणी सुरू केली. त्यावेळी मोटारसायकल शेजारी पाठीवर सॅक अडकवून थांबलेला एक संशयित तरुण पोलिसांना दिसला. पथकाने कोणतीही संधी न देता त्याला वेढा घालून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव धीरज चव्हाण असल्याचे सांगितले.
सॅकमध्ये सापडला शस्त्रांचा साठा!
पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी पंचांसमक्ष आरोपी धीरज चव्हाण याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये ४ देशी बनावटीची पिस्तूल (अग्नीशस्त्रे) आणि पॅन्टच्या खिशात ४ जिवंत काडतुसे (राऊंड) आढळून आली. या शस्त्रांबाबत कायदेशीर परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
अधिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की, ही पिस्तूल त्याने मध्यप्रदेशातील 'पाजी' (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सेंधवा, मध्य प्रदेश) नावाच्या व्यक्तीकडून कमी किमतीत खरेदी केली होती आणि ती सांगली जिल्ह्यात जादा दराने विक्री करण्यासाठी आणली होती. पोलिसांनी सर्व शस्त्रे, २५ हजार रुपयांची बजाज सिटी १०० मोटारसायकल आणि सॅक असा एकूण २,६७,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ सूर्यकांत यशवंत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध गु.र.नं. २१२/२०२६, आर्म ऍक्ट ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस करत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार सूर्यकांत साळुंखे, संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, सुशिल मस्के, अभिजीत ठाणेकर, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सतीश अलदर आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली. जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर ही मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.