भाजपाने २०१४ साली केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली. याचबरोबर विविध राज्यांमधील सत्ता काबीज करण्यातही पक्षाला यश आले. २०१४ नंतर भाजपा सातत्याने यशाची शिखरे गाठत असताना भाजपाचाही पराभव होऊ शकतो, असा अंदाज ॲक्सिस माय इंडियाचे संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी वर्तवला आहे. जोपर्यंत सरकारची कामगिरी चांगली आहे, तोपर्यंत भाजपा सत्तेतून बाहेर जाणार नाही, असे विधान गुप्ता यांनी केले आहे.
प्रदीप गुप्ता यांच्या ॲक्सिस माय इंडिया या संस्थेने अनेक निवडणुकांच्या एक्झिट पोलचे अचूक अंदाज वर्तवले होते. प्रदीप गुप्ता यांनी भाजपाच्या राजवटीची तुलना काँग्रेसशी केली. एकेकाळी काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता उपभोगली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय राजकारण त्याच एकपक्षीय वर्चस्वाचा अनुभव घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपा कितीकाळ सत्तेत राहणार?
हिंदुस्तान टाइम्सने पीटीआय वृत्तसंस्थेचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, भाजपा किती वर्ष सत्तेत राहण्याची शक्यता आहे, याचा ढोबळ अंदाज व्यक्त करताना प्रदीप गुप्ता म्हणाले की, २०१४ साली भाजपाने पहिल्यांदा सत्ता मिळवली. त्यांची सत्ता किमान २० वर्ष राहू शकते. प्रदीप गुप्ता यांच्या संस्थेने नुकत्याच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवला होता. जोसेफ विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तेत येईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. गुप्ता म्हणाले की, जोपर्यंत सत्ताधारी पक्षाची प्रशासकीय कामगिरी ढासळत नाही. तोपर्यंत त्या त्या पक्षाचे सत्तेतील स्थान अढळ राहते.काँग्रेस पक्षाचे उदाहरण देत असताना प्रदीप गुप्ता यांनी सत्तेचा एक काळ येत असतो, असे उदाहरण दिले. लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल समोर आल्यानंतर प्रदीप गुप्ता टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओतच रडू लागले होते. 'काँग्रेसने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९७७ पर्यंत सत्ता अनुभवली. त्यानंतर त्यांना अडचणी येऊ लागल्या. त्याकाळात एक राजकीय पिढी २० वर्ष राहते, असे बोलले जात होते. त्याप्रमाणे आजही हे २० वर्षांचे चक्र कायम राहील, असे दिसते', अशी प्रतिक्रिया गुप्ता यांनी पीटीआयशी बोलताना दिली. याप्रमाणेच भाजपाही एवढा काळ सत्तेत राहू शकते, असेही ते म्हणाले.
भाजपाला आणखी चांगली कामगिरी करावी लागेल
विद्यमान सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे भाजपाला आता आणखी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, असेही गुप्ता म्हणाले, भाजपाला मोठा जनाधार मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपा आणि एनडीएला आता आणखी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. जोपर्यंत त्यांची कामगिरी खालावत नाही, तोपर्यंत भाजपाचा विजय होत राहील आणि विरोधकांना पराभवाचा सामना करत राहावा लागेल, असेही गुप्ता म्हणाले.
म्हणून काँग्रेसचा पराभव
काँग्रेसबद्दल बोलताना गुप्ता म्हणाले की, काँग्रेसला त्यांच्या भूतकाळातील आरोपांचा सामना करावा लागत आहे. सत्ता असताना त्यांच्याकडून झालेला गैरकारभार अजूनही विस्मरणात गेलेला नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनरागमन होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. आता जरी २०२९ च्या निवडणुकीची चर्चा केली तरी ते १५ वर्ष सत्तेबाहेर असतील. माझे वैयक्तिक मत आहे की, काँग्रेसला आणखी ५ वर्ष सत्तेबाहेर राहावे लागेल. त्यानंतर देश कदाचित त्यांचे म्हणणे स्वीकारेल.
प्रदीप गुप्ता स्टुडिओतच रडले होते
लोकसभा निवडणूक २०२४ चे एक्झिट पोलचे आकडे चुकल्यानंतर प्रदीप गुप्ता यांची चांगलीच फजिती झाली होती. सर्वच एक्झिट पोलने भाजपाला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात जाहीर झालेल्या निकालात भाजपा स्वबळावर बहुमत मिळवू शकले नाही. ॲक्सिस माय इंडियाचे एमडी प्रदीप गुप्ता यांनी भाजपा ४०० हून अधिक जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, मात्र फोल ठरलेले अंदाज पाहता ॲक्सिस माय इंडियाचे एमडी प्रदीप गुप्ता यांनी एका लाईव्ह टीव्ही शोमध्ये अक्षरश: हंबरडा फोडला
ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणात काय होते?
'ॲक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६१-४०१ जागा मिळतील असे म्हटले होते. गुप्ता यांच्या एक्झिट पोलमध्ये 'इंडिया' आघाडीला १३१-१६६ जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीचे अधिकृत निकाल आले तेव्हा चित्र पूर्णपणे उलट होते. भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या. बहुमताच्या आकड्यापासून ते ३२ जागांनी मागे होते. एनडीएला मिळून २९२ जागा मिळाल्या. त्यामुळे एनडीए ३०० चा आकडाही पार करू शकली नाही. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीने मात्र मोठी आघाडी घेतली. काँग्रेसने स्वबळावर ९९ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीला २०० जागा मिळाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.