नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी एका तहसीलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बुद्धभूषण निळकाजे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना जेसीबी मशीनला लटकावून सुमारे ४ किलोमीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. ही घटना बुधवारी घडली. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तहसीलदाराला जेसीबीला लटकवून नेण्याची हिंमत होते… आणि सरकार मात्र शांत बसून तमाशा पाहतंय अशी पोस्ट वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नागपूरच्या कुही तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांवर मुरूम माफियांचा हल्ला होतो, तहसीलदाराला जेसीबीला लटकवून नेण्याची हिंमत होते… आणि सरकार मात्र शांत बसून तमाशा पाहतं! ज्या राज्यात प्रशासनालाच गुंडांची भीती वाटते, त्या राज्यात सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची? कायदा आता संविधानाने नाही, तर माफियांच्या दादागिरीने चालतोय का?महिला असुरक्षित, चिमुकल्या मुली असुरक्षित, अधिकारी असुरक्षित… आणि सत्ताधारी मात्र फक्त जाहिरातींमध्ये "सुरक्षित महाराष्ट्र" दाखवण्यात व्यस्त! जनतेच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये.. अन्यथा याचे खूप गंभीर परिणाम होतील." असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेमकी काय आहे घटना?
बुद्धभूषण निळकाजे हे कुही तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. बेकायदा मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते कारवाईसाठी घटनास्थळी गेले होते. मात्र, तेथे आधीच दबा धरून बसलेल्या वाळू माफिया व गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी तहसीलदारांना मारहाण केली आणि त्यांना जेसीबीला बांधून/लटकवून ४ किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
पोलिस कारवाई
कुही पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार निळकाजे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनाची भूमिका
जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बेकायदा उत्खननावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूलमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने अहवाल मागितला आहे. ही घटना महाराष्ट्रात वाळू माफियांच्या दादागिरीचे पुन्हा एक उदाहरण ठरली आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून अशा घटनांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.