Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरण: मेकअप आर्टिस्ट आणि बिल्डरचे गूढ संबंध उघड, तपासात मोठी खळबळ!

कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरण: मेकअप आर्टिस्ट आणि बिल्डरचे गूढ संबंध उघड, तपासात मोठी खळबळ!


मुंबई: मुंबईतील पायधूनी परिसरात रात्री कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण अलीकडे उघडकीस आलं होतं. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

त्यांना अन्नबाधा झाली नाही तर त्यांना विष देण्यात आलं. कुटुंबासोबत घातपात झाला, असे अनेक संशय व्यक्त करण्यात आले. दरम्यान आता कलिंगड खाऊन चार जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील मयत अब्दुल्ला डोकाडिया हे ज्या एका महत्त्वाच्या गुन्ह्यात साक्षीदार होते, त्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला आणि आरोपी बिल्डर हे चक्क पती-पत्नी असून त्यांच्यातील आर्थिक आणि कौटुंबिक वादाचा हा गुंता आता चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमीदा शेख नावाच्या एका मेकअप आर्टिस्ट महिलेनं मुंबईतील बिल्डर आफताफ याच्याविरोधात एक गुन्हा दाखल केला होता. बिल्डरवर अनेक कलमं लावण्यात आली होती. याच प्रकरणात अब्दुला डोकाडिया हे प्रमुख आणि एकमेव साक्षीदार होते.
नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार हमीदा शेख या अमेरिकेत राहून मेकअप आर्टिस्ट म्हणून व्यवसाय करायच्या. हमीदा आणि आरोपी आफताब हे दूरचे नातेवाईक असून त्यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. आफताबचे आधीच एक लग्न झालं होतं, मात्र त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हमीदाशी लग्न केलं. हमीदाने त्याच्यासाठी अमेरिकेतील आपला जम बसलेला व्यवसाय सोडून भारतात आल्या. दोघांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती.


२५ लाखांचा व्यवहार आणि अब्दुल्ला साक्षीदार


आफताबचे वडील बिल्डर होते, मात्र कालांतराने त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय डबघाईला आला होता. दरम्यान, लग्नाआधी २०१९ साली आफताबने हमीदाकडे व्यवसायासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी हमीदाने २५ लाख रुपये आफताबला दिले. आफताबने ही रक्कम घेण्यासाठी अब्दुल्ला डोकाडिया यांना हमीदाकडे पाठवलं होते. याच कारणामुळे या आर्थिक व्यवहारात अब्दुल्ला हे 'एकमेव साक्षीदार' म्हणून समोर आले होते. लग्नानंतर हमीदाने आफताबला वेळोवेळी ६.७५ लाख आणि ३ लाख अशी मोठी रक्कम दिल्याचा देखील आरोप आहे.
अनैसर्गिक अत्याचार आणि फसवणुकीचे आरोप


हमीदा आणि आफताबने २०२० मध्ये लग्न केल्यानंतर सुरुवातीला दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होतं. मात्र काही काळानंतर या दाम्पत्यामध्ये खटके उडू लागले. हमीदाने आफताबवर अत्यंत गंभीर आरोप केले. आफताबने केवळ पैशांसाठी आपली फसवणूक केली नाही, तर तो आपल्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करत असल्याचा आरोप हमीदा यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून २०२३ मध्ये त्यांनी आफताब विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी आफताबवर BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर कलम 377, 420, 498-अ, 504 आणि 506 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, विवाहित महिलेवर क्रूरता, जाणीवपूर्वक अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे. तसेच गुन्हेगारी धमकी देणे असे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. अशात या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार अब्दुला डोकाडिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे आता अब्दुला यांच्या मृत्यूचं कनेक्शन या प्रकरणाशी जोडलं जात आहे. प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही प्रकरणाचा खरंच काही संबंध आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.