Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपमध्ये 'राजकीय भूकंप' येणार? शिंदेंच्या जीवाबाबतच्या 'त्या' दाव्याने खळबळ; वाचा ५ मोठे अपडेट्स

भाजपमध्ये 'राजकीय भूकंप' येणार? शिंदेंच्या जीवाबाबतच्या 'त्या' दाव्याने खळबळ; वाचा ५ मोठे अपडेट्स


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव उद्धव ठाकरे यांच्यामुळेच वाचला, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले… प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील नेत्याने दिली… माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतःला शिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली… शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आणि त्यांना उद्ध्वस्त करणारा राक्षसी प्रकल्प असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला… भाजपाचे सहावेळचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह हे लवकर आपल्या समर्थकांसह समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंचा जीव ठाकरेंमुळेच वाचला, बड्या नेत्याचे विधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांचा जीव वाचला, असे विधान त्यांनी मुंबईतील जाहीर पत्रकार परिषदेतून केले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वर्क फ्रॉम होमवाल्यांमुळे मिसिंग लिंकचे काम रखडले होते, अशी अप्रत्यक्ष टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्यासमोर महाराष्ट्राचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे सगळ्यात मोठे आव्हान होते. करोना काळात त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे एकनाथ शिंदे यांचाही जीव वाचला. झाडे तोडणे, रस्ते बांधणे हे केव्हाही होऊ शकते, असा टोलाही राऊत यांनी शिंदे यांना लगावला.

२०२९ मध्ये भाजपा-शिंदेसेना स्वबळावर लढणार?

प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकतात, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. भाजपा भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपामध्ये जातील, असा उल्लेख ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना "प्रत्येक राजकीय पक्ष आपली संघटना मजबूत करण्याच्या आणि निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्रपक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाही. भाजपा २०२९ ला स्वबळावर निवडणूक लढवू शकतो का? तर लढवू शकतो. हीच गोष्ट शिवसेना (शिंदे) पक्षालाही लागू होते, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री बच्चू कडूंवर ठाकरे गटाचा प्रहार

अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला शिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्यास स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे व कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटोपल्यावर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरू महाराज शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकताच शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यानंतर विधान परिषदेची उमेदवारीही त्यांना देण्यात आली. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने कडू यांना लक्ष्य केले आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, काही गोष्टी लढून नाही तर गनिमी काव्याने सिद्ध कराव्या लागतात. टीका फार मनावर घेऊ नये, असे कडू यांनी म्हटले आहे.

'शक्तीपीठ'वरून राजू शेट्टींचा फडणवीसांवर हल्लाबोल

शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आणि त्यांना उद्ध्वस्त करणारा राक्षसी प्रकल्प असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. गरज नसलेला महामार्ग देवांच्या नावाखाली अदानींसारख्या 'महादेवां'साठी केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण घालत आहेत. या अनावश्यक महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवर १ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोझा टाकला जात आहे. हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपार केल्याशिवाय राज्यातील जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
भाजपात लवकरच मोठा राजकीय भूकंप?

महिला कुस्तीपटूंच्या शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उत्तर प्रदेशातील भाजपाचे सहावेळचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपाला सोडचिठ्ठी देऊन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जर आमचे ओझे वाटत असेल तर भाजपाने आता आमची गरज नाही, असे एकदा सांगावे, मग आम्हीही आमचे उपयोग मूल्य दाखवून देऊ, असा इशाराच ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने ब्रिजभूषण यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत त्यांच्या मुलाने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र पक्षाकडून बाजूला सारले गेल्याने ब्रिजभूषण सिंह नाराज असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ते आपल्या समर्थकांसह समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. जर ब्रिजभूषण सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास भाजपामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल, असे तर्कवितर्क लावले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.