पुणे : आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेण्याआधीच पुण्यातील एका नवरदेवाचा खोटेपणाचा बुरखा फाटला. एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू असतानाच दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरवून फसवणूक करणाऱ्या सागर सतीश नेटके (रा. धानोरी) याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या हळदी समारंभातच प्रेयसीने धडक देत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.
मिळालेल्या माहितीनुसार, सागरने वधू-वर सूचक ग्रुपच्या माध्यमातून धानोरीतील २९ वर्षीय तरुणीशी ओळख वाढवली होती. स्वतःला इंजिनिअर असल्याचे सांगत त्याने मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत १५ मार्च रोजी साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी लाखो रुपये खर्च केले होते. त्यानंतर १३ मे रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, ११ मे रोजी सागरच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक एका तरुणीने तिथे येत "मी सागरची गर्लफ्रेंड आहे" असा दावा केला. तसेच, सागर तिची फसवणूक करून दुसरे लग्न करत असल्याचेही तिने सांगितले. हा प्रकार समोर येताच नवरीसह तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.फसवणुकीची जाणीव होताच तरुणीने तात्काळ लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी हॉल, केटरिंग, बस्ता, दागिने आणि इतर तयारीवर सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. हा खर्च आणि दिलेले दागिने परत मागितल्यानंतर सागर आणि त्याच्या नातेवाईकांनी नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, यानंतर पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत सागर नेटके याला अटक केली. तसेच, त्याच्या नातेवाईकांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.