काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पायधुनी परिसरात कथितपणे कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. संबंधित कुटुंबीयांनी रात्री जेवण झाल्यानंतर एकत्रितपणे कलिंगड खाल्लं होतं. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. काही वेळाच्या अंतराने या चारही जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच, आता अशीच एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे.
छातीतील जळजळ आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड खाणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर तब्येत बिघडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांचा तरुण मुलगा सध्या रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर अशाप्रकारे मृत्यू झाल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील श्योपूर शहरातील आहे. येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ इंद्रसिंग परमार (वय ४३) हे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. ते कार चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर इंद्रसिंग आणि त्यांचा मुलगा विनोद (वय २१) या दोघांनाही छातीत जळजळ होत असल्याचा त्रास सुरू झाला. मात्र, सुरुवातीला सामान्य त्रास समजून दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते झोपी गेले. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा त्यांना तोच त्रास जाणवू लागला. वाढत्या उष्णतेमुळे पोटात जळजळ होत असावी, असा अंदाज बांधून पोट थंड व्हावे म्हणून त्यांनी बाजारातून कलिंगड आणून खाल्लं.
कलिंगड खाल्ल्यानंतर उलट्या आणि अस्वस्थता
पोट थंड करण्यासाठी खाल्लेले कलिंगड त्यांच्यासाठी काळ ठरेल, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच बाप-लेकाची तब्येत सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. दोघांनाही तीव्र अस्वस्थ वाटू लागलं आणि मोठ्या प्रमाणात उलट्या सुरू झाल्या.दोघांचीही प्रकृती खालावत चालल्याचे पाहून घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी राजस्थानमधील कोटा येथे हलवण्याचा सल्ला दिला.कुटुंबीय रुग्णवाहिकेतून दोघांना कोटा येथे घेऊन जात असतानाच, वाटेत इंद्रसिंह यांची प्रकृती अत्यंत खालावली आणि त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला. तर दुसरीकडे, मुलगा विनोद याला कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी व्यक्त केला 'हा' संशय
या धक्कादायक घटनेनंतर वैद्यकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केवळ कलिंगड खाल्ल्यामुळे तब्येत बिघडल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. डॉक्टरांच्या मते, हा प्रकार गंभीर 'फूड पॉइजनिंग' (अन्नबाधा) किंवा शरीरात झालेल्या इतर कुठल्यातरी घातक संसर्गामुळे घडला असावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.