भीषण उकाड्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृतरीत्या पाऊल ठेवले असून तो अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असून, श्री विजय पुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या अंदमान परिसरात ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे सक्रिय झाले आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती वेगाने अपेक्षित आहे.
यंदा वेळेआधीच केरळात आगमन
यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सामान्यत: 1 जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ईशान्य भारतात मुसळधार; उत्तर भारतात उष्णतेची लाट
मान्सून अंदमानात दाखल झाला असतानाच, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे मात्र, उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात अद्यापही उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.