१९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा बँकेत, अन् १२ दिवसांत खात्यात १५ लाख! जितूचा 'डेथ गेम' की नियतीचा खेळ?
भुवनेश्वर : बँकेच्या जाचक नियम-अटींना कंटाळून एका गरीब आदिवासी व्यक्तीने आपल्या मयत बहिणीचा सांगाडा बँकेत नेला आणि आता तरी माझे १९,३०० रुपये द्या, अशी आर्त मागणी केल्याचा प्रकार ओडिशात १०-१२ दिवसांपूर्वी समोर आला होता. यानंतर प्रशासन जागं झालं आणि सूत्रं हलली. आज त्याच ५२ वर्षीय जितू मुंडाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा झाले आहेत.
ओडिशातील हृदयद्रावक घटना
जितूची बहीण कलारा हिच्या बँक खात्यात १९,४०० रुपयांची शिल्लक होती. तिच्या मृत्यूनंतर पैसे काढण्यासाठी जितू २७ एप्रिल रोजी बँकेत गेला. बँकेच्या व्यवस्थापकाने त्याला सांगितलं की, जर त्याने आपल्या बहिणीला सोबत आणलं, तरच त्याला ते पैसे मिळतील. त्यानंतर जितूने आपल्या बहिणीचा सांगाडा तिच्या कबरीतून बाहेर काढला आणि तो तीन किलोमीटर चालत बँकेपर्यंत घेऊन गेला. ही घटना ओडिशाच्या केओंझर जिल्ह्यातील दियानाली गावात घडली होती.पतीच्या निधनानंतर, कलारा आपल्या माहेरी राहत होती. जितू अविवाहित आहे. जितूच्या घरात त्याच्या बहिणीव्यतिरिक्त, त्याचा भाऊ आणि त्याचं कुटुंबही राहतं. एका वर्षापूर्वी, कलाराला सरकारकडून एक घर मिळालं होतं. जितू बेरोजगार आहे. त्याची उपजीविका पूर्णपणे कलाराला सरकारकडून मिळणाऱ्या १,००० रुपये आणि ३५ किलो तांदळावर अवलंबून होती.
वासरु विकून १९ हजार ४०० रुपये
एका वासराची विक्री करून मिळालेले १९,४०० रुपये तिने पटना ब्लॉकमधील 'मल्लिपासी ग्रामीण बँके'त जमा केले होते. जितू आणि कलारा अधूनमधून बँकेत जाऊन १००, २०० किंवा ५०० रुपयांसारख्या लहान रकमा काढत असत.
एके दिवशी कलारा आजारी पडली. जितूने तिला रुग्णालयात नेलं, पण काही उपयोग झाला नाही. २६ जानेवारी रोजी तिचं निधन झालं. जितूच्या उदरनिर्वाहाचं साधनच संपुष्टात आलं होतं. त्याची शेवटची आशा बँकेत जमा असलेल्या पैशांवरच उरली होती; आणि हीच रक्कम काढण्यासाठी तो बँकेत गेला होता.
बँक कर्मचाऱ्यांचा हेका
साधारणपणे दहा वाजता जितू बँकेत गेला. कर्मचाऱ्यांनी कागदपत्रं मागितली. मात्र जितू अशिक्षित असल्याने त्याला ती सादर करता आली नाहीत. तो एकच गोष्ट बोलत होता, माझ्या बहिणीच्या नावावर पैसे आहेत, ते परत द्या. बँक कर्मचारी म्हणाले, तिला घेऊन ये आणि पैसे घेऊन जा. तो साडेअकरा वाजता परतला. साधारण बारा वाजता त्याने कबर खणायला सुरुवात केली.
मुंडा समाजात दफनाची प्रथा
मुंडा समाजात मृतांवर अग्निसंस्कार करण्याऐवजी त्यांचं दफन केलं जातं. आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर जितू मुंडा आणि त्याच्या कुटुंबाने कलाराला त्यांच्या घराच्या अगदी जवळच दफन केलं. कडाक्याच्या उन्हामुळे परिसरात सामसूम होती; त्यामुळे त्याला कोणीही पाहिलं नव्हतं.
देशभरातून मदतीचा ओघ
तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून, त्याच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमेव्यतिरिक्त, त्याला विविध संस्था आणि राजकीय पक्षांकडून सुमारे १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. यात फिजिक्सवालाचे सीईओ अलख पांडे यांनी केलेल्या दहा लाखांच्या मदतीचा समावेश आहे. तर राजस्थानचे कृषीमंत्री किरोडी लाल मीणा यांनी एक महिन्याचं वेतन - १ लाख ४५ हजार रुपये जितूला दिले. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.आता त्याच्या बहिणीच्या घरी विजेचे जोडणी करण्यात आली असून, जितू सध्या तिथेच राहत आहे. माझी बहीण हेच माझे घर आहे. मला कशाचीही भीती वाटत नाही; ती अगदी इथेच, माझ्या सोबत आहे. माझी बहीण निघून गेल्यापासून मी पूर्णपणे एकाकी झालो आहे. आमच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तीच माझ्यासाठी सर्वस्व होती. माझ्याकडे ना रेशन कार्ड आहे, ना इतर कोणतीही कागदपत्रे; सर्व काही माझ्या बहिणीचंच होतं, असं जितू सांगतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.