Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजकीय वर्तुळात खळबळ! पहाटेच मंत्र्यांच्या निवासस्थानी 'ईडी'चे पथक धडकले; २० गाड्यांसह मोठा फौजफाटा

राजकीय वर्तुळात खळबळ! पहाटेच मंत्र्यांच्या निवासस्थानी 'ईडी'चे पथक धडकले; २० गाड्यांसह मोठा फौजफाटा


पंजाबमधील कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर पहाटे ईडीने छापा टाकलाय. तब्बल २० वाहनांमधून ईडीचे अधिकारी सकाळी सकाळीच अरोरा यांच्या घरी दाखल झाले. चंदीगडमधील सेक्टर २ येथे संजीव अरोरा यांचे घर आहे, या ठिकाणी आज सकाळी साडेसात वाजता ईडीने अचानक छापा मारला. या घटनेनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी यावर टीका केली आहे. सुडबुद्धीने ईडीकडून छापा टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

छापा मारताना ३ डझन सीआयए आणि एसएफ जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. या छापेमारीवर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. आप खासदार संजय सिंह म्हणाले की, भाजपची सुपारी किलर असलेली ईडी आज पुन्हा पंजाबमध्ये दाखल झाली आहे. कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या निवासस्थानी छापे सुरू झाले आहेत. हे नाटक दोन-तीन दिवस चालेल. खोट्या बातम्या पसरवल्या जातील आणि सुपारी किलर निघून जातील. त्यानंतर, त्यांचे बॉस त्यांना नवीन काम देतील.

ईडी चंदीगड आणि दिल्ली-एनसीआरमधील संजीव अरोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चार ठिकाणांवर छापा मारला. यात मंत्री म्हणून संजीव अरोरा यांना वाटप केलेल्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानाचा समावेश आहे. ईडीने दिल्ली, गुडगाव आणि चंदीगडमधील पाच ठिकाणांवर छापे टाकले, ज्यात हॅम्पटन स्काय रियल्टी लिमिटेडच्या कार्यालयाच्या जागेचा आणि संजीव अरोरा यांच्या घराचा समावेश आहे.
संजय सिंह यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींना पंजाबच्या भगवंत मान सरकारला बदनाम करायचे आहे का? पंजाबच्या लोकांची कामे थांबवायची आहेत का? त्यासाठी आणखी किती डावपेच वापरणार आहात? दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भगवंत मान यांनी केंद्रातील सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत ईडीच्या कारवाईला चुकीचे म्हटलेय.
भगवंत मान म्हणाले की, भाजपच्या ईडीने आज पुन्हा एकदा संजीव अरोरा यांच्या घरी धाड टाकली. वर्षभरात भाजपच्या ईडीने त्यांच्या घरी भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. तरीही, त्यांना काहीही सापडले नाही. पंजाब ही गुरूंची भूमी आहे. औरंगजेबसुद्धा ती जिंकू शकला नाही. ही भगतसिंगांची भूमी आहे, जे ब्रिटिशांपुढे कधीही झुकले नाहीत. त्यामुळे, पंजाब मोदींच्या डावपेचांना कधीही बळी पडणार नाही. पंजाब ईडी आणि भाजप यांच्यातील ही अनैतिक युती संपुष्टात आणेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.