मुंबई : पाचच महिन्यांपूर्वी त्विशा सिंग हिचं वकील समर्थ सिंग याच्यासोबत लग्न झालं होतं, पण मंगळवार 12 मे च्या रात्री अचानक त्विशाच्या मृत्यूची बातमी तिच्या घरच्यांना सांगण्यात आली. आपल्या 33 वर्षांच्या मुलीचा मृत्यू अचानक कसा झाला? याचं उत्तर त्विशाचे आई-वडील शोधत आहेत. तसंच त्विशाच्या मृत्यूबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्विशाचा सासरी छळ होत असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
आईला शेवटचा फोन कॉल
त्विशाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी त्विशाने आईला फोन करून सासरी होत असलेल्या छळाबद्दल सांगितलं. त्विशा आईसोबत बोलत असतानाच तिचा नवरा रूममध्ये आला आणि त्यानंतर तिने अचानक फोन कट केला, असं त्विशाच्या भावाने सांगितलं. त्विशाचा भाऊ हर्षित शर्मा हा भारतीय लष्करात मेजर आहे. फोन कट झाल्यानंतर घरच्यांनी त्विशाला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच प्रतिसाद दिला नाही. 10 मिनिटांनंतर रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास त्विशाची सासू गिरीबाला सिंग यांनी फोन उचलला, यानंतर त्विशाच्या पालकांनी मुलीला तात्काळ फोन द्या, असं सांगितलं. यानंतर आणखी 5 मिनिटांनी रात्री 10.20 वाजता त्विशा श्वास घेत नसल्याचं सासरच्या लोकांनी त्विशाच्या घरी कळवलं.त्विशाला यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रुग्णालय 10 मिनिटांच्या अंतरावर असूनही वैद्यकीय उपचारात विलंब झाल्याचा आरोप त्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. आम्ही रात्री 11.30 वाजता रुग्णालयात पोहोचलो असं मेजर शर्मा म्हणाले. माझ्या बहिणीचा मानसिक छळ झाला तसंच तिच्यासोबत कौटुंबिक हिंसाचारही झाला, तिला गर्भपात करायला भाग पाडले गेले, असा आरोप त्विशाच्या भावाने केला आहे.
मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप
'प्रेग्नंट झाल्यानंतर माझ्या बहिणीने बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं, पण पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्यावर गर्भपात करण्यासाठी प्रचंड दबाव आणला आणि जबरदस्ती केली. तसंच तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला गेला. पोटात वाढत असलेलं मूल आपलं नसल्याचा आरोपही त्विशाच्या पतीने केला. सततचा मानसिक दबाव आणि कौटुंबिक जबरदस्तीमुळे त्विशाचा गर्भपात केला गेला', असं त्विशाचा भाऊ म्हणाला आहे.
त्विशाला हुंड्यासाठीही छळलं गेलं. वडिलांनी भेट म्हणून दिलेले 20 लाख रुपयांचे शेअर्स आणि गुंतवणूक तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी स्वत:च्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला, असा आरोपही कुटुंबाने केला आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं?
त्विशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर शरीराच्या इतर भागांवर मृत्यूपूर्वी अनेक जखमा झाल्याचा उल्लेखही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे. तसंच आठवड्याभरापूर्वी त्विशाचा गर्भपात करण्यात आल्याचंही रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. तसंच त्विशावर विषप्रयोग केला गेला का? हे पाहण्यासाठी तिच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसंच नखांचे नमुने डीएनएसाठी जतन करण्यात आले आहेत.पोलिसांनी त्विशाचे कपडे आणि सेलोटेप सील करून तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच गर्भाशयही तपासणीसाठी जतन करून ठेवण्यात आला आहे. त्विशाची सासू निवृत्त न्यायाधीश आणि पती वकील असल्यामुळे पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची आणि तपास प्रभावित होण्याची भीती कुटुंबाला वाटत आहे, त्यामुळे त्यांनी घरही सिल करण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी त्विशाचा पती समर्थ सिंग याच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात त्विशाची सासू गिरीबाला सिंगलाही आरोपी करण्यात आलं आहे. त्विशाही उत्तर प्रदेशच्या नोएडाची रहिवासी होती, 5 महिन्यांपूर्वीच तिचं लग्न भोपाळमधील वकील समर्थ सिंग याच्यासोबत झालं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.