Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परिपत्रक गेले खड्ड्यात! प्रवीण परदेशी आणि लोकप्रतिनिधींचा सरकारी आदेशाला ‘खो’, परदेश दौऱ्याची हौस भागवण्यासाठी नियमांची सर्रास पायमल्ली!

परिपत्रक गेले खड्ड्यात! प्रवीण परदेशी आणि लोकप्रतिनिधींचा सरकारी आदेशाला ‘खो’, परदेश दौऱ्याची हौस भागवण्यासाठी नियमांची सर्रास पायमल्ली!


मुंबई :- परकीय चलनाचे संवर्धन करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले परदेश दौरे रद्द करण्याची सूचना असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार तथा 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ शनिवारी डेन्मार्कच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले. परदेश दौरे रद्द करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाला खुद्द वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विधिमंडळाच्या 12 आमदारांनी जपान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कान्स फेस्टिव्हल तर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी 13 मे 2026 रोजीच्या परिपत्रकाद्वारे अधिकाऱ्यांचे मंजूर परदेश दौरे रद्द करण्याची सूचना केली आहे. मात्र, केंद्रीय गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर नगरविकास विभागाने शुक्रवारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या डेन्मार्क दौऱ्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

रॉयल डेन्मार्क एम्बेसीच्या वतीने डेन्मार्क येथे 'टेक्निकल अवेअरनेस व्हिजिट ऑन क्लायमेट स्मार्ट वॉटर' या विषयावर 16 ते 24 मे या दरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात प्रवीण परदेशी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. एस. आर. नाईक, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, उमरेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्राजक्ता आदमाने सहभागी झाले आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ शनिवारी डेन्मार्ककडे रवाना झाले.
दौऱ्यात कोणाकोणाचा समावेश?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार तथा 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. एस. आर. नाईक
सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे
सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते
उमरेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्राजक्ता आदमाने

पोलीस सुरक्षा आणि वाहने काढून घ्या - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावी. देशावरील ऊर्जा आणि आर्थिक संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेव्हा अगदीच गरज भासल्यास ती पुन्हा बहाल करण्याचा विचार करावा. परंतु, सद्यस्थितीत आपण कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि गाड्या काढून घ्याव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.