सांगली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका कार्यालयात सध्या ‘प्रवीण अण्णा’ नावाच्या झिरो कर्मचाऱ्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्याच्या दहशतीमुळे कार्यालयातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले आहे. स्वतःला अतिशय प्रभावशाली समजणाऱ्या या व्यक्तीने पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरत आपली हुकूमत गाजवण्यास सुरुवात केली आहे.
महिला कर्मचाऱ्यांनाही हीन वागणूक
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवीण अण्णा हा कार्यालयातील शिस्त आणि नियमांना धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांशी अत्यंत उद्धटपणे वागतो. विशेष म्हणजे, महिला कर्मचाऱ्यांशी बोलतानाही या अण्णाकडून किमान सभ्यता पाळली जात नाही. “माझा नाद कोणी करायचा नाही, मी कोणालाही जुमानत नाही,” अशा धमक्या देत त्याने कार्यालयात स्वतःची समांतर सत्ताच प्रस्थापित केल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
“वरिष्ठ माझ्या हातातील बाहुले...”
एवढेच नव्हे तर, आपली तक्रार कोणाकडेही करा, मला काहीही फरक पडत नाही, अशी बतावणी तो उघडपणे करतो. “वरिष्ठ अधिकारी माझ्या हातातील बाहुले आहेत,” असे विधान करून त्याने थेट प्रशासकीय व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे या मुजोर अण्णाला नेमका कोणाचा वरदहस्त लाभला आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कारवाईची मागणी जोर धरतेय
शासकीय कार्यालयात सेवा देत असताना सौजन्याची वागणूक देणे अपेक्षित असताना, प्रवीण अण्णासारख्या झिरो कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, सीसीटीव्ही फुटेज किंवा कर्मचाऱ्यांच्या साक्ष घेऊन संबंधित अण्णाचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि त्याच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.