Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा: यश खंडागळेची जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक रौप्यभरारी!

सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा: यश खंडागळेची जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक रौप्यभरारी!


सांगली: इजिप्तमधील इस्मालिया येथे सुरू असलेल्या 'कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत' सांगलीच्या यश खंडागळेने रौप्यपदकाची ऐतिहासिक कमाई करत भारताचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात रौप्यपदक जिंकणारा यश हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताला केवळ तीन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले होते. ​यशने ७३ किलो वजनी गटात आपले कौशल्य पणाला लावत स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६९ किलो असे एकूण ३०९ किलो वजन उचलून हे यश संपादन केले.

​संघर्षातून यशाकडे:

यश हा सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचा (कला शाखा, प्रथम वर्ष) विद्यार्थी आहे. त्याचे वडील विनायक खंडागळे यांचे बालाजी मिल रोडवर छोटेसे सलून दुकान आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही यशने जिद्द सोडली नाही. तो कॉलेज आणि सराव सांभाळून वडिलांना व्यवसायातही मदत करतो. सुरुवातीला प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्यानंतर, गेल्या आठ महिन्यांपासून तो पुण्यातील 'हाय परफॉर्मन्स सेंटर'मध्ये इराणी प्रशिक्षकांकडे विशेष प्रशिक्षण घेत आहे.

​पुढील लक्ष्य 'राष्ट्रकुल':
वजनी गटातील तांत्रिक बदलांमुळे यशला राष्ट्रकुल आणि एशियन गेम्स २०२६ ची संधी हुकली होती. मात्र, त्या निराशेला त्याने यशात बदलले. आता २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी यश हा भारताचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.