राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्य करावे : मालनताई मोहिते
आरक्षणाचे जनक, प्रजेला सुखी आणि राज्याला समृद्ध करणारे दूरदर्शी, न्यायप्रिय व कर्तव्यनिष्ठ राजे राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि सर्व जाती-धर्मातील युवक-युवतींच्या शिक्षणासाठी बोर्डिंगची निर्मिती करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जनसेवेचे कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मालनताई मोहिते यांनी केले.
सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना मोहिते पुढे म्हणाल्या की, शाहू महाराजांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी आभार मानले. या प्रसंगी शमशाद नायकोडी, जन्नत नायकवडी, उस्मान मगदूम, नामदेव पठाडे, प्रकाश माने, विठ्ठलराव काळे, मुफित कोळेकर, गणेश वाघमारे, आप्पा पाटणकर यांच्यासह काँग्रेसचे इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.