‘सोनं खरेदी करू नका!’ मोदींच्या आवाहनाला शरद पवारांचे प्रत्युत्तर; पत्राद्वारे सुचवला 'हा' भन्नाट पर्याय!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करून नका आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मोदींच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलं असून देशात अस्थिततेचं वातावरण तयार झालंय की काय, अशी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहीजे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहाता अर्थतज्ज्ञ उद्योग क्षेत्रातील लोकांची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, असं खुले पत्र पवारांनी मोदींना लिहिलंय.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्या - शरद पवार
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबविणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं मत देखील शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलवा - शरद पवार
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, असा सल्ला शरद पवारांनी मोदींना दिलाय.
सरकारचे सर्वोच्च प्राधान्य...
पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा, अशी विनंती देखील शरद पवारांनी यावेळी केली. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे, असंही शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.