'डोक्यावरचा टिळा गेला, पण माज काही जाईना'; 'पश्चाताप होतोय का?' विचारताच पत्रकारांवर भडकला शिवराज मोटेगावकर!
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील नामांकित 'आरसीसी' (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तपासातून त्याच्याविरोधात भक्कम पुरावे मिळाल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. त्याच्या मोबाईलमध्ये आणि लातूरमधील घरी रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. तसेच लातुरातून अटक करण्यात आलेल्या प्रा. कुलकर्णी याच्यासोबतचे पेपरफुटीचे कनेक्शनही सीबीआयने न्यायालयाला अधिक स्पष्ट करून सांगितले.
सीबीआयने लातूर येथे केलेल्या तपासादरम्यान शिवराज मोटेगावकर याच्या घरावर छापा टाकला होता. या झाडाझडतीत सीबीआयला त्याच्या घरातून रसायनशास्त्र विषयाची नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त केली. दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडनंतर दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने शिवराज मोटेगावकर याची १० दिवसांची सीबीआय कोठडी मागितली. त्यावेळी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण ऐकल्यानंतर न्यायालयाने मोटेगावकर याची ९ दिवसांची सीबीआय कोठडी दिली.
CBI कोर्टातून नेताना पत्रकारांनी विचारलं, पश्चाताप होतोय का? शिवराज मोटेगावकर रागाने लालबुंद
शिवराज मोटेगावकर याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे सीबीआयचे वकील न्यायालयात सांगत असताना न्यायालयाने त्यांना प्रतिप्रश्न केला. शिवराज मोटेगावकर याच्याकडे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका होती, हे तुम्हाला कसे समजले? असे न्यायालयाने सीबीआयला विचारले. त्यावर सीबीआयने लातुरमधील प्रा. कुलकर्णी याच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीचा हवाला दिला. प्रा. कुलकर्णी याची चौकशी करीत असताना त्याची मोटेगावकरशी असलेली घट्ट मैत्र आणि त्यांच्यातील कनेक्शन अधोरेखित झाल्यावर आम्ही लातूरमधील त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी आम्हाला मोटेगावकर याच्या घरातून प्रश्नपत्रिका मिळून आल्याची माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली. दिल्लीच्या राऊज न्यायालयातून नेताना पत्रकारांनी मोटेगावकर याला तुम्हाला पश्चाताप होतोय का? असे विचारले. त्यावर लालबुंद झालेल्या मोटेगावकर याने पत्रकारांकडे अतिशय रागाने पाहिले. पत्रकारांच्या प्रश्नाचा राग आल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत आपला चेहरा लपवून नंतर खाली मान घालून पोलिसांच्या घेऱ्यातून मोटेगावकर निघून गेला.
शिवराज मोटेगावकर अल्पावधीत 'क्लासक्षेत्रात' लोकप्रिय कसा झाला?
नांदेडमध्ये केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयात पदव्युत्तर परीक्षेत अव्वल क्रमांक मिळविलेल्या मोटेगावकर सरांनी लातूरमध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यावेळी त्यांनी नोकरी मिळविण्यात अपयश आल्याने बहिणीच्या मुलाची शिकवणी त्यांनी घरच्या घरी घेण्यास सुरुवात केली. पुढे शेजार-पाजारची मुले त्यांच्या शिकविण्यासाठी येऊ लागली. यातूनच त्यांच्या क्लासचे बाजारीकरण झाले. आधी केवळ केमिस्ट्री विषय शिकविणाऱ्या मोटेगावकर यांनी नंतर बायोलॉजी आणि नंतर फिजिक्स विषय क्लासमध्ये शिकविण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांचे नाव मोठे झाल्यावर त्यांच्या क्लासमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागू लागल्या. अमुक विद्यार्थ्यांना 'पैकीच्या पैकी गुण' या त्यांच्या चित्तवेधक जाहिरातींनी पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासची भुरळ पडू लागली. क्लासमध्ये प्रवेश, अभ्यासक्रमासाठी वह्या पुस्तके, राहण्यासाठी खोल्या, जेवणासाठी खाणावळी असा उद्योग पुढे उभा राहिला.
NEET पेपरफुटी प्रकरणात 'मोटेगावकरचा सरांचा' रोल काय?
नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर सरांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीबरोबर एक चित्रफित (व्हिडीओ) रेकॉर्ड केली. पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्या क्लासमध्ये कसे आधीच शिकवले गेले होते, त्या विषयासंबंधी आपल्या क्लासने कशी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली होती, असा चित्रफितीचा आशय होता. याच चित्रफितीवरून सीबीआयला संशय आला. तसेच सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत शिवराज मोटेगावकर याचेही नाव आले. त्यावेळी सीबीआयने लातूरात धाड टाकून शिवराज मोटेगावकर याला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये काही संशयित चॅट आणि संपर्क केलेले नंबर सापडल्याने सीबीआयचा संशय खरा ठरला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.