सांगलीत खळबळ! भाजप जिल्हा सरचिटणीसांच्या पत्नीचे १३ तोळे सोने लंपास; बसस्थानकावरील गर्दीचा चोरट्यांनी साधला डाव
सांगली: सांगली येथील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. भाजप जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नी नूतन बाबासाहेब आळतेकर (वय ४४, रा. मिरज) यांची १३ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नूतन आळतेकर या काही कामासाठी सांगली बसस्थानक परिसरात आल्या होत्या. बसस्थानकावर असलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या जवळील पर्सवर डल्ला मारला. या पर्समध्ये सुमारे १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. आपली पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
या घटनेनंतर नूतन आळतेकर यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या बसस्थानक परिसरात झालेल्या या मोठ्या चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.