Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीबीआयची मोठी कारवाई! ज्याने पेपर सेट केला, त्यानेच लावला निकाल? लातूरच्या निवृत्त प्राध्यापकाच्या मुसक्या आवळल्या

सीबीआयची मोठी कारवाई! ज्याने पेपर सेट केला, त्यानेच लावला निकाल? लातूरच्या निवृत्त प्राध्यापकाच्या मुसक्या आवळल्या


लातूर : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने मोठी कारवाई केली असून लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात देशभरातली अनेक शहरात कारवाई होत असताना महाराष्ट्रात नाशिकनंतर लातूरात दुसरी मोठी कारवाई झालेली आहे.

सीबीआयने ताब्यात घेतलेला प्राध्यापक कोण?
प्राथमिक माहितीनुसार नीट परीक्षेचे पेपर सेट करण्याचे काम संबंधित निवृत्त प्राध्यापकाकडे होते. लातूरच्या एका नामांकित महाविद्यालयातून तीन चार वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले आहेत. रसायनशास्त्र विषय शिकविणाऱ्या संबंधित प्राध्यापकाकडे नीट परीक्षेचे पेपर सेट करण्याचे काम होते. आज सकाळी सीबीआयच्या पथकाने संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून संबंधित प्राध्यापकाकडे पेपर सेट करण्याचे काम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या आधीच्या काळातही त्याच्याकडून पेपर फूट झाली होती का, यासंदर्भाने सीबीआय तपास करीत आहे. या कारवाई संदर्भात सीबीआयने कमालीची गुप्तता पाळली होती.

एका क्लासेसकडून सीसीटीव्ही हार्ड डिस्क जप्त

लातूरात एका खासगी क्लासेसमधील तीन ते चार जणांची कसून चौकशी सुरू असून, रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्ही हार्ड डिस्क जप्त केली आहे.कोणत्या क्लासेसविरोधात तक्रार करण्यात आली आहे, याबाबत विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. संबंधित क्लासेसचा कथित पेपरफुटी रॅकेटशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस घेत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पोलिस विभागाने अधिकृत प्रेस नोटही जारी केली आहे. दरम्यान, NEET (UG)-2026 पेपरफुटी संदर्भात कोणाकडेही महत्त्वाची माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

आमच्या वर्षभराच्या मेहनतीचे काय? विद्यार्थी पालकांमध्ये संतापाचे वातावरण
नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षणाचा आदर्श पॅटर्न देणाऱ्या लातूरमध्ये अनेक विद्यार्थी आणि पालक चिंतेत असून, आमच्या वर्षभराच्या मेहनतीचे काय? असा सवाल करीत आहेत. लातूर हे राज्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र मानले जात असल्याने येथे हजारो विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करतात. परीक्षा रद्द झाल्यानंतर शहरातील नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी, विविध कोचिंग क्लासेसमध्ये संतापाचे वातावरण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.