Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीसह राज्यभरातील 'अर्थपूर्ण' बदल्यांना ब्रेक; 'फिल्डिंग' लावणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले!:,संवर्ग बदलून 'ऐश' करणाऱ्या तज्ज्ञांना घरचा रस्ता; आरोग्य सचिवांचा प्रशासकीय यंत्रणेला दणका.

सांगलीसह राज्यभरातील 'अर्थपूर्ण' बदल्यांना ब्रेक; 'फिल्डिंग' लावणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले!:,संवर्ग बदलून 'ऐश' करणाऱ्या तज्ज्ञांना घरचा रस्ता; आरोग्य सचिवांचा प्रशासकीय यंत्रणेला दणका.


मुंबई/सांगली: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकीय यंत्रणेत स्वतःच्या सोयीनुसार वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांविरुद्ध आता थेट युद्ध पुकारले आहे. संवर्ग बदलून  ऐषो आरामात आणि सोयीच्या जागी काम करणाऱ्या ९०० पेक्षा जास्त डॉक्टरांना ३० जून २०२६ पर्यंत त्यांच्या मूळ पदावर परतण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जे डॉक्टर या आदेशाचे उल्लंघन करतील, त्यांचा जुलै महिन्याचा पगार रोखण्याचे आदेश दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​काय आहे नेमके प्रकरण?

​राज्यात एस-२० (S-20) आणि एस-२३ (S-23) श्रेणीतील अनेक सर्जन, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ हे प्रत्यक्ष रुग्णालयात सेवा देणे अपेक्षित असताना, 'अर्थपूर्ण' तडजोडी करून मंत्रालयातील किंवा इतर प्रशासकीय पदांवर चिकटून बसले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर असूनही ते रुग्णांना तपासण्याऐवजी फाईल्स हाताळण्यात मग्न होते. यामुळे जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये तज्ज्ञांची मोठी कमतरता भासत असून, गोरगरीब रुग्णांना उपचारांविना खासगी रुग्णालयांची पायरी चढावी लागत होती.



सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांचाही समावेश

​या 'सोयीच्या' बदल्यांमध्ये सांगली जिल्ह्यातीलही काही बड्या डॉक्टरांचा समावेश असल्याची चर्चा आहे. तज्ज्ञ असूनही फिल्डवर काम न करता प्रशासकीय खुर्च्या उबवणाऱ्या या डॉक्टरांवर आता गाज पडणार आहे. प्रधान सचिवांच्या या निर्णयामुळे सांगलीतील आरोग्य व्यवस्थेलाही नवे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​"३० जूननंतरही जे डॉक्टर जुन्याच पदावर ठाण मांडून राहतील, त्यांचे वेतन तातडीने थांबवण्यात यावे. केवळ न्यायालयाकडून स्थगिती मिळालेल्या डॉक्टरांनाच तूर्तास सवलत असेल, इतरांना मूळ जागी रुजू व्हावेच लागेल."
 प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग
'अर्थपूर्ण' नियुक्ती देणाऱ्यांचीही चौकशी करा!

​सुमारे ९०० हून अधिक डॉक्टरांना नियमा धाब्यावर बसवून या 'सोयीच्या' आणि 'अर्थपूर्ण' नियुक्त्या नेमक्या कुणी दिल्या? यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का? याचीही सखोल चौकशी प्रधान सचिवांनी करावी, अशी मागणी आता सामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे.

​आरोग्य व्यवस्थेवर होणारा परिणाम:
​रुग्णांना दिलासा: तज्ज्ञ डॉक्टर पुन्हा ओपीडी आणि ऑपरेशन थिएटरमध्ये परतल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा दर्जा सुधारेल.

​प्रशासकीय पारदर्शकता: वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या 'लिंक' आता तुटणार आहेत.

​आदेश धुडकावणाऱ्यांचा पगार रोखण्याच्या निर्णयामुळे प्रशासकीय शिस्त निर्माण होईल.

​आता या 'सर्जिकल स्ट्राईक' नंतर किती डॉक्टर प्रामाणिकपणे सेवा बजावण्यासाठी मूळ पदावर परततात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.