NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; पुण्यातून शिक्षक तेजस शाहला बेड्या, मनीषाच्या मोबाईलमध्ये नंबर होता 'GOD' नावाने सेव्ह!
पुणे: देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या NEET (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) अत्यंत महत्त्वाचं यश मिळालं आहे. CBI ने पुण्यातून तेजस शाह नावाच्या एका शिक्षकाला अटक केली असून, या अटकेमुळे पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे थेट पुण्याशी जोडले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनीषाकडून घेतली होती प्रश्नपत्रिका
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक तेजस शाह याने मनीषा हवालदार नावाच्या महिलेकडून NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका खरेदी केली असल्याचा खळबळजनक आरोप आहे. मनीषा हवालदार ही या रॅकेटमधील एक मुख्य कडी असल्याचा संशय असून, तिच्या चौकशीतूनच तेजस शाहचे नाव समोर आले.
मोबाईलमधील 'तो' नंबर आणि धक्कादायक खुलासा
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, आरोपी मनीषा हवालदारने आपल्या मोबाईलमध्ये तेजस शाहचा फोन नंबर 'GOD' (देव) या नावाने सेव्ह केला होता. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारा पेपर पुरवणारा तेजस शाह हा मनीषासाठी 'गॉड' ठरला होता की या कोडनेममागे आणखी काही मोठे रहस्य दडले आहे, याचा तपास आता CBI करत आहे. मनीषाने तेजसचा नंबर 'GOD' नावाने का सेव्ह केला होता? या दोघांमागे आणखी कोणती मोठी डोकी कार्यरत आहेत? या मुख्य प्रश्नांभोवती आता CBI चा तपास फिरत आहे.
रॅकेटचे मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता
तेजस शाह हा स्वतः व्यवसायाने शिक्षक असल्याने त्याचे विद्यार्थ्यांशी आणि शैक्षणिक वर्तुळाशी थेट संबंध होते. त्याने ही प्रश्नपत्रिका पुढे किती जणांना विकली, यासाठी किती कोटींची देवाणघेवाण झाली आणि या रॅकेटमध्ये पुण्यातील इतर काही कोचिंग क्लासेस किंवा शिक्षण संस्थांचे चालक सामील आहेत का, याचा शोध आता घेतला जात आहे.तेजस शाहच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालय आरोपीला किती दिवसांची CBI कोठडी सुनावणार आणि पुढील चौकशीत कोणते मोठे मासे गळाला लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.