कर्नाटकात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर, आता खात्यांचे वाटप होताच काँग्रेसमध्ये उघडपणे असंतोष पसरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आठ वेळा आमदार राहिलेले रामलिंगा रेड्डी हे त्यांना मिळालेल्या खात्यामुळे प्रचंड नाराज असल्याचे वृत्त आहे. नव्या कॅबिनेटमध्ये रेड्डी यांच्याकडे 'बृहद आणि मध्यम जलसंधारण' (सिंचन) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलिंगा रेड्डी यांची नाराजी इतकी टोकाला पोहोचली आहे की, ते आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रेड्डी यांनी आज सकाळी ९ वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील बोलावली आहे, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जर त्यांनी राजीनामा दिला, तर शपथविधीनंतर अवघ्या ४८ तासांच्या आत शिवकुमार सरकारसाठी हा पहिला आणि खूप मोठा राजकीय धक्का असेल.
नाराजीचे नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रामलिंगा रेड्डी हे 'बेंगळुरू शहरी विकास' या अत्यंत महत्त्वपूर्ण खात्यासाठी आग्रही होते आणि त्यांना या विभागाची कमान हवी होती. मात्र, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ही जबाबदारी ब्याटरायनपुराचे आमदार कृष्णा बायरे गौडा यांच्याकडे सोपवली. रामलिंगा रेड्डी यांना या खात्याऐवजी जलसंपदा किंवा इतर पर्यायी खाती देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून झाला, परंतु रेड्डी यांनी ते स्वीकारण्यास साफ नकार दिला आहे.रामलिंगा रेड्डी यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांच्याशी झालेल्या बैठकीतही आपली तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आता या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस हायकमांड काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.