Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज शहरात पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार आदेश झुगारून फिरणारा सराईत गुन्हेगार शानूर मुजावर जेरबंद!

मिरज शहरात पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार आदेश झुगारून फिरणारा सराईत गुन्हेगार शानूर मुजावर जेरबंद!


मिरज :- सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आलेला सराईत गुन्हेगार शानूर करीम मुजावर (वय ३८, रा. चौगुले मळा झोपडपट्टी, म्हैशाळ रोड, मिरज) याला मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) रविवारी (२८ जून) रात्रीच्या सुमारास झडप घालून अटक केली. जिल्हा बंदीचा आदेश धुडकावून तो मिरजेतच लपून राहिल्याचे समोर आले असून, त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​अंधाराचा फायदा घेण्याच्या तयारीत होता आरोपी

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शानूर मुजावर याला उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांच्या आदेशान्वये १९ नोव्हेंबर २०२५ पासून एक वर्षाकरिता सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही तो कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मिरजेतील चौगुले मळा, म्हैशाळ रोड येथील आपल्या घराशेजारी अंधारात दबा धरून बसला होता.
​याबाबतची गोपनीय माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला रात्री पावणे नऊच्या सुमारास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत बिराप्पा कंगार यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खुन, मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला 'सराईत' अटक करण्यात आलेला आरोपी शानूर मुजावर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर मिरज शहर आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुन, मारामारी, जबरी चोरी, आणि बेकायदेशीरपणे धारदार हत्यार बाळगणे यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (मिरज विभाग) श्री. प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरण चौगले, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.