नागपूर : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना उद्देशून लिहिलेले एक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात किराणा दुकाने, सुपरमार्केट आणि विक्री केंद्रांमध्ये चिप्स, कुरकुरे व इतर जंक फूडची मुलांना आकर्षित करणारी मांडणी नियंत्रित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांच्या सोशल मीडिया गटातून हे पत्र प्रसारित झाल्याने त्याची चर्चा रंगली आहे. एका पालकाने तुकाराम मुंढे यांना लिहलेल्या पत्रात मुलांच्या आरोग्यावर जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी नव्हे तर त्यांच्या प्रदर्शनावर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमके पत्रात काय?
पत्रात म्हटले आहे की राज्यातील जवळपास प्रत्येक किराणा दुकान, सुपरमार्केट आणि छोट्या-मोठ्या विक्री केंद्रांमध्ये चिप्स, कुरकुरे आणि इतर जंक फूडची पाकिटे दुकानाबाहेर किंवा प्रवेशद्वाराजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने लावलेली असतात. त्यामुळे लहान मुलांचे लक्ष सहज त्या उत्पादनांकडे जाते आणि ते पालकांकडे ती खरेदी करण्याचा हट्ट करतात. तुकाराम मुंढेंच्या समर्थकांच्या सोशल मीडिया ग्रुपवरून पत्र प्रसारित झाल्याने नागपूरसह महाराष्ट्रात चर्चा.
या मांडणीमुळे कोणती समस्या ?
पत्रानुसार, मुलांनी वारंवार अशा प्रकारचे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक मुले जंक फूडचे नियमित सेवन करत असल्याने पौष्टिक जेवण टाळण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि पोषणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पत्रलेखकाने नेमकी कोणती मागणी केली?
या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली नाही. मात्र, दुकानाबाहेरील किंवा मुलांच्या नजरेस सहज पडेल अशा पद्धतीने केलेले प्रदर्शन नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोणत्या प्रकारचे निर्बंध सुचवण्यात आले आहेत?
पत्रात शक्य असल्यास चिप्स, कुरकुरे आणि तत्सम जंक फूडची पाकिटे दुकानाच्या आतील भागात ठेवण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. तसेच मुलांचे लक्ष वेधून घेणारे अतिआकर्षक प्रदर्शन टाळण्यासाठी दुकानदारांना सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे.
ही मागणी का महत्त्वाची ?
गेल्या काही वर्षांत मुलांमध्ये जंक फूडचे सेवन वाढल्याबाबत विविध स्तरांवर चिंता व्यक्त केली जात आहे. लठ्ठपणा, पोषणातील कमतरता आणि असंतुलित आहार यासारख्या समस्यांशी याचा संबंध जोडला जातो. त्यामुळे मुलांच्या आहाराच्या सवयींवर परिणाम करणाऱ्या घटकांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त केले जाते. सध्या या पत्रावर अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, प्रशासनाने या मागणीची दखल घेतल्यास जंक फूडच्या विक्रीपेक्षा त्याच्या प्रदर्शन आणि जाहिरातीसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे.
सोशल मीडियावर या पत्राची चर्चा का होत आहे?
तुकाराम मुंढे हे प्रशासनातील कठोर आणि नियमप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी संबंधित या विषयावर त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेली मागणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी या प्रस्तावाला समर्थन दिले असून, काहींनी मात्र यामुळे ग्राहकांच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर परिणाम होणार नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.