गोंदिया : वाढती महागाई, इंधनाचे चढे दर, वीजबिलातील वाढ, दुकानांचे भाडे, कामगारांचे वेतन आणि टेलरिंग व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढत्या किमती यामुळे शिलाई व्यावसायिकांनी शिलाई दरात सुमारे ५ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी दरात वाढ झाली असून, काही व्यावसायिक लवकरच वाढ करणार आहेत.
या निर्णयामुळे कपडे शिवून घेणाऱ्या ग्राहकांना आता अधिक खर्च करावा लागणार असून, साध्या शर्ट पँटच्या शिलाईत सरासरी ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. टेलरिंग व्यवसायावर गेल्या काही वर्षांत महागाईचा मोठा परिणाम झाला आहे. व्यवसाय चालविण्याचा खर्च वाढत असताना ग्राहक टिकवण्यासाठी अनेक टेलर्स अत्यल्प नफ्यावर काम करत होते. मात्र, आता वाढत्या खर्चाचा भार सहन करणे कठीण झाल्याने दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. काहींनी तर दिवाळीपासूनच दरवाढ केली आहे.
कशामुळे घेतला दरवाढीचा निर्णय ?
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला, वीजबिलात सातत्याने वाढ, दुकानांचे भाडे आणि देखभाल खर्च वाढला. कामगारांचे वेतन वाढले शिलाई साहित्य महागले. यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती व देखभालीचा खर्च वाढला. अनेक वर्षापासून दरवाढ न झाल्याने आर्थिक ताण आहे.
'रेडिमेड' मुळे टेलर्सचा धंदा बसला
रेडिमेड कपड्यांचा वाढता वापर हा पारंपरिक टेलरिंग व्यवसायासमोरील मोठा प्रश्न बनला आहे. बाजारात कमी किमतीत आणि विविध डिझाइन्समध्ये रेडिमेड कपडे सहज उपलब्ध होत असल्याने शिवून कपडे घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे ग्राहकसंख्या कमी होत असताना खर्च मात्र वाढत असल्याने टेलर्स अडचणीत सापडले आहेत.
कपडे शिवण्यासाठी वाढले बजेट
शिलाई दरात सुमारे १० टक्के वाढ झाल्याने ग्राहकांना कपडे शिवून घेण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. विशेषतः सण-उत्सव, लग्नसराई आणि शालेय गणवेशाच्या हंगामात याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटवर होणार आहे.
टेलरिंग यंत्रे, साहित्याची दरवाढ सोसवेना
टेलरिंग मशीन, मोटर्स, सुया, धागे, बटणे, झिप, अस्तर कापड आणि इतर साहित्याच्या किमतीमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. मशीन दुरुस्ती आणि सुटे भाग मिळविण्याचा खर्चही वाढल्याने टेलर्सना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या खर्चामुळे व्यवसाय टिकवणे कठीण बनल्याचे व्यावसायिक सांगतात.
टेलरनुसार शिलाईचे दर
स्थानिक पातळीवर सध्या साध्या शर्टच्या शिलाईसाठी सुमारे ३५० ते ५०० रुपये, तर पँटसाठी ४५० ते ६०० रुपये आकारले जातात. १० टक्के वाढीनंतर शर्ट व पँटच्या शिलाईत ५० ते १०० रुपये दरवाढ झाली आहे. ब्लाऊजची शिलाई तर २०० ते ५०० अशी आहे. अनेक भागात टेलरनुसार शिलाईचे रेट कमी-जास्त आढळून येतात.
ग्राहक टिकवण्यासाठी अत्यल्प नफ्यावर काम
ग्राहक दूर जाऊ नयेत म्हणून १ अनेक टेलर्स गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प नफ्यावर काम करत होते. काही ठिकाणी वाढलेला खर्च स्वतःच्या खिशातून सहन करून जुनेच दर कायम ठेवण्यात आले. मात्र, आता वाढत्या महागाईमुळे व्यवसाय टिकवण्यासाठी दरवाढ आवश्यक ठरल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तसेच शिवून घेतलेले कपडे 3 फिटिंगच्या दृष्टीने अधिक चांगले असतात. मात्र, वाढत्या खर्चामुळे शिलाई दर वाढविण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही, असे अनेक व्यावसायिकांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
