मागील काही दिवसांपासून नीट पेपरफुटीविरोधात भारतात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अलीकडेच त्यांनी जंतर मंतरवर मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाला यशही आलं. मात्र या आंदोलनात पोलिसानी लाठीचार्ज केल्याच्याही काही घटना उघडकीस आल्या. एकूणच भारतातील आंदोलनात झालेल्या हिंसेची चर्चा सुरू असताना आता भारताशेजारील पाक व्याप्त काश्मिरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सध्या निवडणुकीच्या वातावरणादरम्यान अत्यंत हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक निवडणुका आणि प्रशासकीय कारभाराला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पाकिस्तानी लष्कराने बेछूट गोळीबार केला आहे. या दुर्दैवी घटनेत किमान ३० आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून ५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर काही मीडिया रिपोर्टनुसार, मृतांचा आकडा हा ६७ वर गेल्याची माहिती आहे.
आंदोलकांवर लष्कराची थेट कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी' च्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीविरोधात निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. रावलाकोट येथून मुझफ्फराबादच्या दिशेने निघालेल्या या भव्य मोर्चावर पाक लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून पाक प्रशासनाने तातडीने पीओकेमध्ये १० अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात केल्या. याशिवाय सशस्त्र पोलीस दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू केले असून इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे. लष्कराच्या चिलखती गाड्यांमधून लाउडस्पीकरद्वारे लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे.
लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न
राजकीय विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानातील लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पीओकेमध्ये आपले बाहुले सरकार स्थापन करायचं आहे. इस्लामाबादच्या हो ला हो मिळवणारे सरकार येथे राहावे, असा पाक लष्कर आणि गुप्तचर संस्था 'आयएसआय' (ISI) चा कायम प्रयत्न असतो. यापूर्वी येथे इम्रान खान यांच्या 'पीटीआय' पक्षाचे सरकार होते, मात्र शाहबाज शरीफ सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर पक्षांतर घडवून ते पाडण्यात आलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.