विहान श्रीवास्तव. ११ वर्षाच्या या मुलाने एका दुर्दैवी अपघातात जीव गमावला. पण, या घटनेचा मोठा आघात त्याच्या आईवर झाला. विहान मंगळवारी ज्या स्कूल बसमधून जात होता, तिच्यावर झाड कोसळले. या घटनेत विहानचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्याच्या आईला धक्काच बसला. या घटनेच्या काही तासांनंतरही, विहानची आई त्याची क्रिकेटची बॅट छातीशी कवटाळून बसली होती.
विहान दररोज शाळेतून आल्यानंतर खेळायला जायचा, आजही तो परत येईल आणि खेळायला जाईल, असे समजून ती माऊली तशीच बसली होती. हे दृश्य बघून बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. चेंबूरमधील युनिव्हर्सल स्कूलमधून घरी परतत असताना शाळेच्या बसवर झाड कोसळले. चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वर ही घटना घडली. या घटनेत विहानने आपला जीव गमावला, तर इतर चार मुले जखमी झाली आहेत.
मृत्यूचा धक्का, आई विहानची बॅट घेऊन सुन्न बसली
एका व्हिडीओ समोर आला, ज्यात मृत्यू झालेल्या विहान आई जुही, या त्याची क्रिकेटची बॅट हातात घट्ट धरून शांत बसलेल्या दिसत आहे. आजूबाजूला बसलेल्या महिला त्यांना आधार देत आहेत. त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जुहीच्या शेजारी आणि त्यांची मैत्रिण असलेल्या राजी मल्होत्रा यांनी सांगितले की, विहान हा हुशार मुलगा होता आणि तो अनेकदा त्यांचा मुलगा देव याच्याकडे क्रिकेट शिकण्यासाठी यायचा.
'विहानला क्रिकेटर व्हायचे होते, तो आमच्या घरी यायचा'
"जुहीवर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर फक्त तीच तिलाच कळू शकतो. विहान अनेकदा आमच्या घरी यायचा आणि मला सांगायचा, 'आंटी, मला क्रिकेटपटू व्हायचं आहे.' तो म्हणायचा, 'देवला मला क्रिकेट शिकवायला सांगा ना.' तो खूप समजूतदार, हुशार आणि संस्कारी मुलगा होता आणि क्रिकेटर बनणे हे त्याचे स्वप्न होते", असे सांगताना राजी मल्होत्रा भावूक झाल्या.
विहानला क्रिकेट खेळायला जायचं
"विहानच्या आईचा त्याच्यावर जीव होता. तोच तिचे सर्व काही होता. ती सतत त्याची काळजी करायची. विहान घराबाहेर असला की ती त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दिवसभर त्याला व्हिडिओ कॉल करायची. आताही ती तिथे त्याची क्रिकेटची बॅट धरून बसली आहे. विहान आता या जगात नाही, हे स्वीकारणे तिच्यासाठी खूप कठीण झाले आहे. ती अजूनही सतत हेच म्हणत आहे की विहानला क्रिकेट खेळायला जायचे आहे."
लोक धावले म्हणून वाचले इतर मुलांचे जीव
मंगळवारी दुपारी जेव्हा बसवर झाड कोसळले, तेव्हा बसमध्ये १३ मुले होती. बस कंडक्टर आणि परिसरातील लोक तत्परतेने धावून आली म्हणून मुलांना तातडीने सुखरूप बाहेर काढणे शक्य झाले. तीन मुले आणि दोन मुलींसह पाच विद्यार्थ्यांना जवळच्या 'झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले, तिथे विहानला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, इतर चार जखमी मुलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले की, "जखमींपैकी दोन मुलांची सीटी स्कॅनसह पुढील वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उर्वरित दोन मुलांचीही तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.