Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"ऑफर तर येऊ द्या, विचार करू."; अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ, रोहित पवारांनी 'ऑपरेशन तुतारी'वर काय प्रतिक्रिया दिली?

"ऑफर तर येऊ द्या, विचार करू."; अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ, रोहित पवारांनी 'ऑपरेशन तुतारी'वर काय प्रतिक्रिया दिली?


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर राबवून ठाकरेंच्या सेनेच्या सहा खासदारांना आपल्या पक्षात घेतले. यानंतर आठ दिवसातच सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदी संधी देऊन शिंदेंनी ठाकरेंच्या सेनेला दुसरा धक्का दिला. यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोल्हेंच्या या विधाननंतर ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांवर आमदार रोहित पवारांनी देखील भाष्य केले.

नक्की काय म्हणाले अमोल कोल्हे?
सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोल्हेंनी पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा मांडला. “पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केली पण, यावर तोडगा काढायला हवा”, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रामॅन म्हणून कौतुक केले. दिल्लीतही फडणवीसांचे इन्फ्रामॅन म्हणून कौतुक केले जाते, असेही कोल्हे म्हणाले. तसेच, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मुख्य अलायन्मेंटवरुन जोडण्याची मागणीही केली. विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे रेल्वेचा मार्ग बदलला का? या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना कोल्हे यांनी, “अशी काही ऑफर आली नाही, आली तर विचार करु”, असे उत्तर दिले.
पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा

“राजाभाऊ वाझे आणि अमोल कोल्हे महायुतीत गेल्यास पुणे-नाशिक रेल्वे होईल मग ही रेल्वे विकासासाठी आहे का? लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून पक्षांतर करण्यासाठी आहे?,” असा सवालही कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला. ऑफर आली तर विचार करु यावर बोलताना कोल्हे यांनी, “ऑफर तर येऊ द्यात, त्यामुळे किमान मुख्य अलायन्मेंटवरुन रेल्वे होतेय हे कोणीतरी बोलेल, तसेच, ‘मी विचार करु’, असे म्हणालो, ‘जाऊ’, असे म्हणालो नाही. पुणे – नाशिक रेल्वे होणे महत्वाचे आहे”, असे कोल्हेंनी स्पष्ट केले.

‘ऑपरेशन तुतारी’वर रोहित पवार काय म्हणाले?
अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर बोलताना आमदार रोहित पवारांनी, “कोणताही खासदार, आमदार शरद पवारांना सोडणार नसून ही केवळ चर्चा आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. “अमोल कोल्हे यांची सुरु असणारी मालिका सत्ताधारी पक्षातीलच काही लोकांनी थांबवली, त्यामुळे ते काय असा विचार करतील असं वाटत नाही. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. डिलिमिटेशन कायद्यासाठी खासदार फोडण्यासाठी प्रयत्न केला जाईल पण त्यात यश येईल असं वाटत नाही. सर्व आमदार, खासदारांच्या संपर्कात शरद पवार, सुप्रिया सुळे आहेत”, असे रोहित पवार म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.