बारामतीत दोन पोलिसांविरुद्ध महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा; भरतीत मदतीचे आमिष दाखवून केले अत्याचार
अमरनाथ कुंभार हे सध्या दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत, तर मारुती करे हे मुंबई बँड पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिचा विश्वास संपादन करून पोलीस भरती तसेच बँड्स पथकात संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. भरती प्रक्रियेत मदत करण्याच्या नावाखाली वारंवार संपर्क साधत त्यांनी महिलेची फसवणूक केली आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडितेने सुरूवातीला संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अखेर न्यायासाठी तिने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भरतोय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींवरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पीडित महिलेने आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून देखील आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले नसल्याने न्यायप्रक्रियेबाबत शंका निर्माण होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. आरोपींवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे. तसेच, येत्या काही दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील तिने दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाल्याने तपास यंत्रणांवर निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची जबाबदारी वाढली आहे. या प्रकरणात नेमकी काय तथ्ये समोर येतात आणि आरोपींवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.